Alinagar Assembly Election Result Maithili Thakur Won: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती आले असून, अनेक लक्षवेधी जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यापैकीच एक अत्यंत प्रतिष्ठेची लढत म्हणजे दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर (Alinagar) मतदारसंघातील. येथून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूरने दणदणीत विजय मिळवत आमदारकीची पटकावली आहे. मैथिलीने 11 हजारांची आघाडी घेत विजय मिळवला.
सर्वात कमी वयाची आमदार
मैथिली ठाकूर यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) तगडे नेते विनोद मिश्रा यांचा पराभव केला आहे. अलीनगर जागेसाठी पहिल्या टप्प्यात ६ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीमुळे या जागेवर भाजपचा विजय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्यापासूनच मैथिलीने आघाडी घेतली. प्रत्येक फेरीत मैथिलीने मोठे मताधिक्क्य घेत मोठा विजय मिळवला आहे.
राजकारणात पूर्णपणे नवीन असलेल्या मैथिली ठाकूरने मिथिला प्रदेशातील प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर हा मोठा विजय संपादन केला. एका बाजूला, आरजेडीचे विनोद मिश्रा यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आणि मजबूत संघटनात्मक उपस्थिती असूनही, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. केवळ २५ वर्षांच्या मैथिली ठाकूर यांनी हा विजय मिळवून बिहार विधानसभेतील सर्वात तरुण आमदार (Youngest MLA in Bihar Assembly) होण्याचा मान मिळवला आहे.
लोकप्रियतेच्या जोरावर ऐतिहासिक विजय
अलीनगर हा मिथिला प्रदेशातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, जिथे राजकीय, सांस्कृतिक आणि जातीय गणिते नेहमीच गुंतागुंतीची असतात. या मतदारसंघात ब्राह्मण, यादव, रविदास आणि अत्यंत मागास जातींची लक्षणीय उपस्थिती आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख उमेदवार ब्राह्मण समाजाचे असले तरी, मैथिली ठाकूर यांची सांस्कृतिक ओळख आणि तरुणाईमधील त्यांची पकड यामुळे मतदारांनी पारंपरिक राजकीय अनुभवाऐवजी एका नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.