जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण (Pawan Kalyan) आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. बुधवारी विजयवाडामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमात चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा या कार्यक्रमाला उपस्थित होते. नवे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आंध्र प्रदेशच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा बनले आहेत. काही दिवसांपूर्वी पवन कल्याण यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते त्यांचे मोठे भाऊ आणि सुपरस्टार चिरंजीवीच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. चिरंजीवीबद्दलचा लहान भावाचा आदर आणि प्रेम दाखवणारा हा व्हिडिओ पाहून अनेक जण भावुक झाले होते.
या व्हिडिओमध्ये पवन कल्याण चिरंजीवीच्या पाया पडण्यापूर्वी पायातली चप्पल काढतात आणि नंतर मोठ्या भावाचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढं येतात. अर्थात पवन कल्याण चिरंजीवींच्या पाया पडण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. बुधवारी उपमुख्यमंत्रीपद स्विकारताच ते स्टेजवरुन खाली उतरले. समोर रांगेत बसलेल्या व्यक्तींशी हस्तांदोलन केल्यानंतर मोठे भाऊ चिरंजीवच्या पाया पडून त्यांनी आशीर्वाद घेतला.
मोठ्या भावावर विशेष प्रेम
पवन कल्याण यांनी त्यांचे मोठे भाऊ चिरंजीवींबद्दल नेहमीच आदरपूर्वक मत व्यक्त केलं आहे. 'मला तुम्ही आज स्टार म्हणून पाहात असाल तर त्याचं श्रेय माझ्या भावाचं आहे,' असं पवन कल्याण यांनी सांगितलं होतं.
मला एकेकाळी स्वत:चं आयुष्य संपवावं असं वाटत होतं. त्या खराब काळात मला मोठा भाऊ चिरंजीवी यांनी खूप मदत केली. त्यांनी माझी फक्त समजूत काढली नाही तर माझा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी विश्वास व्यक्त केल्यानंच मी माझ्या आयुष्याकडं नव्यानं पाहण्याचं धाडस करु शकलो, अशी भावना पवन कल्याण यांनी व्यक्त केली होती.
( नक्की वाचा : Pawan Kalyan : ती रात्र ते आजचा दिवस; आंध्र प्रदेशच्या राजकारणातील नवं 'वादळ' )
2008 मध्ये राजकारणात एन्ट्री
पवन कल्याण यांनी 2008 साली राजकारणात प्रवेश केला. चिरंजीवी यांच्या प्रजाराज्यम पक्षाचे ते अध्यक्ष झाले. चिरंजीवी यांनी काँग्रेसबरोबर आघाडी केल्याचा निर्णय त्यांना पटला नव्हता, असं सांगितलं जातं. या निर्णयावर ते नाराज होते. त्यांनी पुढं 2014 साली स्वत:ची जनसेना पार्टी स्थापन केली.
या दोन्ही भावांमधील विचारधारेत फरक असल्याच्या बातम्या देखील व्हायरल झाल्या होत्या. पवन कल्याण यांनी या विषयावरचं मौन सोडलं. मी मोठ्या भावाच्या विरुद्ध उभा आहे, याचा मला खेद आहे. पण, त्यांच्या आणि माझ्या नात्यात काहीही बदल झालेला नाही. मी त्यांच्यावर आजही पूर्वीसारखंच प्रेम करतो. ते देखील तितकंच प्रेम करतात,' असं पवन यांनी स्पष्ट केलं.
चिरंजीवींनी केलं होतं आवाहन
दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार चिरंजीवी यांनी निवडणुकीपूर्वी पवन कल्याण यांना मत देण्याचं आवाहन केलं होते. माझा लहान भाऊ लोकांची सेवा करण्यासाठी स्वत:चा पैसा खर्च करत आहे, त्याला कृपया तुमचा आशीर्वाद द्या, असं आवाहन चिरंजीवी यांनी केलं होतं.
पवन कल्याणचं कुटुंब
पवन कल्याणला कोनिडेला राव आणि अंजना देवी ही दोन मुलं आहेत. चिरंजीवी आणि नागेंद्र बाबू हे त्यांचे दोन भाऊ आहेत. चिरंजीवीचं लग्न तेलुगु चित्रपटातील विनोदी अभिनेता अल्लू रामलिंगैय्या यांची मुलगी सुरेखा कोनिडेलाबरोबर झालं. चिरंजीवींना सुष्मिता आणि श्रीजा या दोन मुली आहेत. तर राम चरण हा मुलगा आहे. राम चरण देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो पवन कल्याणचा पुतण्या आहे.
पवन कल्याणचे दुसरे भाऊ नागेंद्र बाबू यांचं लग्न पद्मजा कोनिडेलाबरोबर झालं. त्यांना दोन मुलं आहेत. मुलीचं नाव निहारिका कोनिडेला तर मुलाचं नाव वरुण तेज आहे. हे दोघंही प्रसिद्ध कलाकार आहेत. पवन कल्याण यांना दोन बहिणी असून विजया दुर्गा आणि माधवी राव असं त्यांचं नाव आहे. दुर्गा यांना साई धरम तेज आणि पंजा वैसग्नव तेज ही दोन मुलं आहेत. ते देखील अभिनेते आहेत.