आसाममध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. या पुरात आतापर्यंत 82 जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर जवळपास 1 लाख 78 हजार जणांना या पुराचा फटका बसला आहे. राज्यातील सात जिल्हे या पुराच्या विळख्यात आली आहेत. तर 15 हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन अजूनही पाण्याखाली आहे. त्यात एक दिलासा देणारी बातमी नाझिरा या भागातून आली आहे. इथं एका 25 वर्षाय तरुणाने जिवाची बाजी लावत जवळपास पाच गावातल्या दोन हजार जणांचा जीव वाचवला आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत विश्व शर्मा हे पुरग्रस्त भागाची पाहाणी करणार आहेत.
आसाममधील पूरस्थिती, नदीकाठची धूप आणि मदत कार्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. हिमंत विश्व शर्मा 2 ते 5 ऑगस्ट दरम्यान शिवसागर, दिब्रुगढ आणि चराईदेव या तीन जिल्ह्यांच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. शिवाय आवश्यक ती मदत सरकार देईल असं आश्वासन ही त्यांनी या निमित्ताने दिलं आहे. यावेळी ते पुरग्रस्तांसोबत संवाद साधणार आहेत.
आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील नाझिरा भागात 19 जुलै रोजी दिखौ (Dikhow) नदीला आलेल्या भीषण पुरामुळे हाहाकार उडाला होता. या कठीण प्रसंगात बीहुबोर येथील 25 वर्षीय श्रावण कुमार या तरुणाने अतुलनीय शौर्य दाखवले आहे. स्वतःचे घर पाण्यात जात असतानाही त्याने कुटुंबाचा विचार न करता परिसरातील सुमारे 2000 लोकांचे प्राण वाचवले आहेत. मानवतेचे एक अनोखे उदाहरण त्याने या निमित्ताने सर्वां समोर ठेवले. श्रावण हा 10 वी नंतर शिक्षण सोडून दिलेला तरुण आहे.
त्याच्याकडे कोणतेही औपचारिक आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नव्हते. तसेच कोणतीही मोटाराइज्ड बॉट नव्हती. त्याने 'तुलुंगा नाव' म्हणजेच लाकडी होडीच्या सहाय्याने बचाव कार्य केले. यावेळी त्याला त्याचा मित्रांचा ही मदत झाली. ज्या ठिकाणी अनुभवी नावाडी जाण्यास घाबरत होते, तिथे श्रावण आणि त्याच्या टीमने रात्रीच्या गडद अंधारात जिवाची पर्वा न करता लोकांचे जीव वाचवले. अचानक आलेल्या पुरामुळे नाझिरा भागातील विजेचे खांब पडले आणि संपर्क यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. पाणी वेगाने वाढत असल्याने लोक घराच्या छतावर आणि स्लॅबवर आश्रयासाठी चढले होते. श्रावणने 5 गावांमधील लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींना सुरक्षित स्थळी पोहोचवले. "मी स्वतःचे घर वाचवायला गेलो असतो, तर इतरांना वाचवायला कोणीच उरले नसते," असे श्रावणने सांगितले.