ऑस्ट्रेलिया: एका तरुणीने इन्स्टाग्राम प्रँक म्हणून केलेलं लग्न रद्द व्हावं यासाठी कोर्टात धाव घेतली. एका डेटींग अॅपवर या तरुणीची एका तरुणासोबत ओळख झाली होती. या तरुणाने एक प्रँक करायचा आहे असं या तरुणीला सांगितलं होतं. या तरूणीनेही त्या प्रँकमध्ये भाग घेण्यास होकार दिला होता. मात्र या बनावट कार्यक्रमात तरुणाने या तरुणीशी लग्न केल्याचं तिला उशिराने कळालं. सोशल मीडियावर आपली हवा व्हावी यासाठी या तरूणाने आपण प्रँक करत असल्याचे तरुणीला सांगितले होते. या प्रँकमुळे आपले फॉलोअर्स वाढतील, लाईक्सचा पाऊस पडले असं या तरुणाचं म्हणणं होतं. या दोघांची काही महिन्यांपूर्वीच भेट झाली होती असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सदर प्रकार ऑस्ट्रेलियातील असून तिथल्या कौटुंबिक न्यायालयातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या कागदपत्रांनुसार ही तरुणी 20 वर्षांची आहे तर तरुण 30 वर्षांचा आहे. या दोघांची टिंडर नावाच्या डेटींग अॅपवर 2023 साली ओळख झाली होती. या अॅपवर भेट झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी तरुण-तरुणी भेटले होते आणि त्यानंतर सातत्याने भेटतच राहिले. हे दोघेही मेलबर्नमध्ये राहतात आणि या दोघांनी डिसेंबर महिन्यात सिडनीला फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता.
सिडनी आल्यानंतर तरुणाने या तरुणीला एका पार्टीला येशील का अशी विचारणा केली होती. या पार्टीमध्ये पांढऱ्या कपड्यांची थीम असल्याने तू देखील पांढऱ्या रंगाचा छान ड्रेस घालून ये असं या तरुणाने सांगितलं होतं. सिडनीची ट्रीप आधीच ठरली होती आणि यापूर्वी तिने अशाच एका पार्टीला हजेरी लावली असल्याने तरुणीला काहीही संशय आला नव्हता. त्यामुळे तिने तरुणाने सांगितल्याप्रमाणे पांढरा ड्रेस घालून पार्टीला येण्याचं मान्य केलं.
( नक्की वाचा : 'राजकारणात काहीही होऊ शकतं', भावी समीकरणांवर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य )
पार्टीच्या ठिकाणी जेव्हा ही तरुणी पांढरा ड्रेस घालून आली तेव्हा तिला दिसलं की ती सोडून इतर कोणीही पांढरा ड्रेस घातलेला नव्हता. यामुळे थोडा संशय आलेल्या तरुणीने तरुणाला प्रश्न विचारला की हे सगळं काय चाललंय? यावर त्या तरुणाने सांगितलं की हा एक प्रँक आहे. आपल्याला इन्स्टाग्रामवर फेसम व्हायचंय, आपले व्हिडीओ दणक्यात चालावेत आणि इन्स्टाग्रामच्या व्हिडीओतून कमाई व्हावी यासाठी आपण हा प्रँक रचल्याचे त्याने सांगितले.
मात्र थोडावेळाने तिला कळालं की हा सगळा प्रकार प्रँक नसून तो खरा आहे. मात्र तोपर्यंत तिचं लग्न झालेलं होतं. तरूणीने तरुणाला जाब विचारला असता त्याने सांगितलं की ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळावे यासाठी इथल्या तरुणीशी लग्न करण्याचा त्याने प्लॅन केला होता. ही तरुणी लग्नासाठी तयार होईल की नाही हे माहिती नसल्याने त्याने बनाव रचून त्या तरुणीला लग्नाच्या ठिकाणी आणले होते. तरुणीचं सगळं म्हणणं ऐकल्यानंतर कोर्टाने हे लग्न रद्द करत असल्याचा आदेश दिला.