Ayodhya Ram Mandir Namaz Attempt : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मंदिर परिसरातील दक्षिण परकोट भागात एका तरुणाने नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला, ज्याला तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने रोखले. ही घटना घडल्यानंतर मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सध्या या तरुणाला सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा काश्मीरचा रहिवासी असल्याचे समजते. हा तरुण राम मंदिर परिसरात शिरल्यानंतर त्याने दक्षिण परकोट भागात नमाज पठण करण्यास सुरुवात केली. तिथे उपस्थित असलेल्या काही भाविकांचे या प्रकाराकडे लक्ष गेले आणि त्यांनी तातडीने तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांना याची कल्पना दिली.
सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करताच तरुणाने विशिष्ट संप्रदायाशी संबंधित घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
( नक्की वाचा : Pandharpur News : पंढरपुरात भाविकांसाठी 'फाइव्ह स्टार' व्यवस्था; स्काय वॉक, लिफ्ट आणि बरंच काही, वाचा सविस्तर )
सुरक्षा यंत्रणांकडून तरुणाची कसून चौकशी
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तो तरुण एकटाच आला होता की त्याच्यासोबत आणखी कोणी होते, तसेच या कृत्यामागे त्याचा नेमका काय उद्देश होता, या दिशेने तपास चक्रावली जात आहेत. विशेष म्हणजे, अयोध्येत कडेकोट बंदोबस्त असताना हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर अयोध्या जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा अधिकृत विधान जारी केलेले नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बाब अत्यंत संवेदनशील असल्याने सर्व बाबींची पडताळणी केल्याशिवाय अधिकृत माहिती दिली जाणार नाही. दक्षिण परकोटाच्या ज्या भागात ही घटना घडली, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत जेणेकरून या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होऊ शकेल.
भाविकांमध्ये सतर्कता आणि सुरक्षा व्यवस्था
राम मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा परिस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे मंदिर परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि मंदिराचे पावित्र्य जपले जावे, यासाठी सुरक्षा रक्षकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतरच यामागचे नेमके सत्य समोर येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.