बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) राजीनामा दिल्यानंतर सोमवारी भारतामध्ये आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख हसीना यांनी भारतामध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यांचं भारतासोबतचं नातं खूप जुनं आहे. त्या ऐकेकाळी जवळपास तीन वर्ष दिल्लीतील एका कोठीमध्ये त्यांच्या नवऱ्यासोबत राहिल्या होत्या. शेख हसीना त्यांच्या आयुष्यातील खडतर कालखंडात कुठं राहणार हे नक्की नाही. पण, त्या भारतामध्ये आल्यापासून दिल्लीतल्या कोठी नंबर 56 ची मोठी चर्चा आहे.
मिसेस मजूमदार म्हणून होतं वास्तव्य
दिल्लीतल्या लाजपत नगर-3 मधील 56 नंबरची कोठी आता हॉटेल डिप्लोमेट रिजेन्सी चालवत आहे. या कोठीच्या भोवती सध्या मीडियाची वर्दळ आहे. त्यामुळे तेथील लोकांना माहिती झालं की 1975 ते 1977 या काळात शेख हसीना त्यांचे पती वाजिद मियांसोबत इथं राहत होत्या. शेख हसीना यांना पहिल्यांजी रिंग रोडवरील या कोठीमध्ये आणि नंतर पंडारामध्ये शिफ्ट करण्यात आले होते.
त्यांचं दिल्लीतील वास्तव्य अतिशय गुप्त ठेवण्यात आलं होतं. त्यांचे पती वाजिद मियां मिस्टर मजूमदार आणि शेख हसीना मिसेस मजूमदार म्हणून राहत होत्या.
.... म्हणून भारतात राहण्याचा निर्णय
शेख हसीना यांनी 2022 साली दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली होती. त्यांच्या वडिलांची हत्या झाली त्यावेळी त्या बहीण आणि नवऱ्यासोबत युरोपात होत्या. त्यानंतर त्यांनी भारतामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. भारतामधून त्यांना कुटुंबातील किती जणांना मारलं याची माहिती मिळवणं सोपं होतं, असं कारण हसीना यांनी सांगितलं होतं.
( नक्की वाचा : शेख हसीना यांच्या आयुष्यातील सर्वात खडतर 45 मिनिटं, वाचा सत्ता सोडण्यापूर्वी नेमकं काय झालं? )
भारत सरकारनं केली होती व्यवस्था
शेख हसीना यांनी इंदिरा गांधी यांना भारतामध्ये येण्याची माहिती दिली होती. त्यानंतर भारत सरकारनं त्यांची राहण्याची व्यवस्था केली. या व्यवस्थेनुसारच लाजपत नगरमधील कोठी नंबर 56 किरायानं घेण्यात आली होती.
या कोठीचे मालक पुनीत कोहली यांनी सांगितलं की, त्यांच्या आजोबानं भारत सरकारच्या आग्रहामुळे ही कोठी किरायानं दिली होती. त्यानंतर याचे बांगलादेश दूतावासामध्ये रुपांतर करण्यात आले. 2001 साली कोहली यांनी या कोठीचे हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.