- भारत सरकारने देशातील पहिले सरकारी मालकीचे टॅक्सी सेवा अॅप भारत टॅक्सी सुरू केले आहे.
- प्रायोगिक तत्त्वावर सुरु झालेल्या या टॅक्सी सेवेने ओला, उबर आणि रॅपिडो समोर स्पर्धा निर्माण केली आहे
- ड्रायव्हर्सना प्रवासी भाड्याची 100 टक्के रक्कम दिली जाते, ज्यामुळे ते आर्थिक दृष्ट्या अधिक लाभदायक ठरेल.
परवडणाऱ्या वाहतुकीसाठी सरकारी पुढाकाराने टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. भारतातील पहिले सरकारी मालकीचे टॅक्सी सेवा अॅप, 'भारत टॅक्सी अॅप', सुरू करण्यात आले आहे. अनेक वेळा खाजगी टॅक्सी चालकांचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. अनेक वेळा भाडी नाकारली जातात. काही वेळातर टॅक्सी चालक असभ्य वर्तनही करतात. त्यांच्या या सर्व गोष्टींना आळा बनण्यासाठी देशातील पहिली सरकारी टॅक्सी रस्त्यावर धावणार आहे. यामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या खाजगी टॅक्सी सेवांची मक्तेदारीला आव्हान निर्माण होणार आहे. शिवाय त्यांना स्पर्धा निर्माण झाल्यास त्यांची सेवाही सुधारण्यास मदत होण्याची दाट शक्यता आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू
ही सरकारी टॅक्सी दिल्लीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Operation) सुरू झाली आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या खाजगी टॅक्सी सेवांच्या मक्तेदारीला आव्हान देत, हे सरकार-समर्थित राईड-हेलिंग अॅप जानेवारी 2026 मध्ये पूर्णपणे सुरू केले जाईल. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे ते ड्रायव्हर्सना प्रवासी भाड्याची 100% रक्कम देईल. ज्यामुळे टॅक्सी चालकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
सहकार तत्त्वावर आधारित मॉडेल
'भारत टॅक्सी' सेवा सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड (बहु-राज्य सहकारी संस्था) द्वारे चालवली जाते. अमूल, इफको, कृभको, नाफेडसह एकूण 8 प्रमुख सहकारी संस्थांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. ड्रायव्हर्सना सक्षम करणे आणि नागरिकांना परवडणारी, विश्वासार्ह वाहतूक प्रदान करणे हा या अॅपचा उद्देश आहे. आतापर्यंत 51,000 हून अधिक ड्रायव्हर्सनी या अॅपवर आपली नोंदणी केली आहे.
व्यवहारातील स्पष्टता आणि तांत्रिक सुविधा
हे अॅप 'झिरो-कमिशन' मॉडेलवर (Zero-Commission Model) काम करते. ज्यामुळे संपूर्ण कमाई थेट ड्रायव्हर्सना मिळते. 10 नोव्हेंबर रोजी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर याचे सॉफ्ट लाँच झाले. तर त्यानंतर दिल्ली आणि राजकोट येथे ड्रायव्हर अॅप लाँच करण्यात आले. 'भारत टॅक्सी' मध्ये वाहन ट्रॅकिंग, भाड्याची संपूर्ण स्पष्टता, 24/7 ग्राहक सेवा आणि बहुभाषिक इंटरफेस (हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी) यांसारखी महत्त्वाची फीचर्स उपलब्ध आहेत. हे अॅप सध्या गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.