Bhojshala Complex: मध्य प्रदेशातील धार येथील शतकांपासून वादग्रस्त राहिलेला ऐतिहासिक भोजशाला परिसर हे मंदिरच आहे, असा ऐतिहासिक आणि अत्यंत मोठा निर्णय इंदूर उच्च न्यायालयाने दिला आहे. भोजशाला परिसर आणि कमाल मशिदीचा वादग्रस्त भाग हे संस्कृत शिक्षणाचे केंद्र आणि मंदिर असल्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयानंतर आता या ऐतिहासिक वास्तूमध्ये मुस्लिम पक्षाला नमाज पठण करता येणार नसून तिथे केवळ हिंदूंनाच पूजाअर्चा करण्याचा अधिकार असणार आहे. या परिसरामध्ये केंद्र सरकार देवी सरस्वतीची मूर्ती आणून स्थापित करू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
भोजशाला परिसराचे सत्य काय?
या प्रकरणात हिंदू पक्षाची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी न्यायालयाच्या निर्णयाची सविस्तर माहिती दिली. धार येथील ही संपूर्ण इमारत राजा भोज यांच्या काळात बांधण्यात आली असून ती कमाल मौला मशीद नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता या संपूर्ण परिसरामध्ये केवळ पूजाअर्चाच केली जाऊ शकते.
न्यायालयाने सरकारला या वास्तूच्या व्यवस्थापनासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण परिसरावर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय (ASI) चे पूर्ण नियंत्रण कायम राहणार आहे.
( नक्की वाचा : Ram Mandir : राम मंदिरावरील ध्वजात दडलंय काय? PM मोदींनी सांगितले 13 'शक्तीशाली' अर्थ, वाचून वाटेल अभिमान )
मुस्लीम पक्षासाठी पर्यायी जागेचा पर्याय
उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाला पूजेचा संपूर्ण अधिकार दिला असला, तरी मुस्लिम पक्षालाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या वादग्रस्त ठरलेल्या मूळ परिसरावर मुस्लिम पक्षाचा कोणताही कायदेशीर हक्क नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, कमाल मशिदीसाठी मुस्लिम पक्ष सरकारकडे वेगळ्या जागेची मागणी करू शकतो आणि सरकारने मुस्लिम समाजाला मशिदीसाठी पर्यायी जमीन उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत
इंदूर उच्च न्यायालयाच्या या मोठ्या निर्णयानंतर धारचे शहर काजी यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो, पण या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. या खटल्यामध्ये मुस्लिम पक्षाच्या वतीने सलमान खुर्शीद यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. आता मुस्लिम पक्ष या निकालाचा सविस्तर अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्याला नक्कीच न्याय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world