लोकसभा निवडणुकीच्या नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये भारतीय जनता पक्षानं केरळमध्ये खातं उघडलंय. केरळमधील त्रिचूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार आणि अभिनेते सुरेश गोपी विजयी झाले. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात केरळमधून भाजपाला मिळालेला हा पहिला विजय आहे. या ऐतिहासिक विजयानंतर गोपी यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. गोपी यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन अद्याप आठवडा देखील झालेला नाही. त्यातच त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची आता देशभर चर्चा सुरु झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुरेश गोपी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं 'मदर ऑफ इंडिया' असं वर्णन केलंय. केरळचे दिवगंत नेते आणि माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांचं वर्णन 'धाडशी प्रशासक' असं केलंय. भाजपाच्या नेत्यांनी करुणाकरण आणि मार्क्सवादी नेते ई.के. नयनार हे माझे 'राजकीय गुरु' असल्याचंही यावेळी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - कोण आहेत जॉर्जिया मेलोनी? मेलोनींबाबतच्या 'या' आहेत 10 रंजक गोष्टी
केरळमधील पुनकुन्नममधील करुणाकरण यांच्या 'मुरली मंदिर' या स्मारकाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. विशेष म्हणजे गोपी यांनी त्रिचूर लोकसभा निवडणुकीत करुणाकरण यांचा मुलगा मुरलीधरन यांचा पराभव केलाय. 26 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर होते. करुणाकरण यांच्या स्मारकाला भेट देण्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये. मी इथं माझ्या गुरुला श्रद्धांजली देण्यासाठी आलो आहे, असंही भाजपा नेत्यानं यावेळी सांगितलं.
नयनार आणि त्यांची पत्नी शारदा टिचर यांच्याशी तसंच करुणाकरण आणि त्यांची पत्नी कल्याणीकुट्टी यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते. मी 12 जून रोजी नयनार यांच्या घरी देखील गेलो होतो, असं गोपी यांनी स्पष्ट केलं.
गोपी यांनी सांगितलं की, ते इंदिरा गांधी यांना 'मदर ऑफ इंडिया' समजतात. तर करुणाकर त्यांच्या 'राज्य काँग्रेसचे बाप' होते. करुणाकरण यांना केरळ काँग्रेसचा बाप समजल्यानंतरही आपल्या मनात देशातील सर्वात जुन्या पक्षाचे संस्थापक किंवा सह-संस्थापकाबद्दल कोणताही अनादर नाही, असं गोपी यांनी स्पष्ट केलं.