BJP MLA Wife Mrs Bihar : राजकीय कुरघोडींसाठी प्रसिद्ध असलेल्या बिहारमधून एक वेगळी बातमी समोर आली आहे. भोजपूरच्या बडहरा येथील भाजप आमदार विशाल प्रशांत सिंह यांच्या पत्नी ऐश्वर्या राज यांनी ‘मिसेस बिहार 2025' चा किताब जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन पटनामध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत ऐश्वर्या यांनी आत्मविश्वास, प्रतिभा आणि शालीनतेच्या जोरावर पुरस्कार पटकावला.
ऐश्वर्या राज यांच्या पुरस्कारानं त्यांच्या भोजपूर जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे. त्यांचे आमदार पती विशाल प्रशांत सिंह यांनीही सोशल मीडियावर पत्नीचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांच्या मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले. पारंपरिक वेशभूषेत ऐश्वर्याने व्यासपीठावर ज्या आत्मविश्वासाने बिहारची सांस्कृतिक प्रतिष्ठा सादर केली, त्याने परीक्षकांना खूप प्रभावित केले.
या स्पर्धेत बिहारच्या विविध जिल्ह्यांतून स्पर्धकांनी भाग घेतला होता, परंतु ऐश्वर्याचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्व आणि सामाजिक समज लक्षवेधी ठरली. व्यासपीठावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना, त्यांनी महिलांचे शिक्षण, आत्मनिर्भरता आणि समाजात त्यांची बदलती भूमिका यावर भर दिला.
हा विजय केवळ एक वैयक्तिक यश नाही, तर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून आपली स्वप्ने पूर्ण करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक प्रेरणा आहे. एका राजकारण्याची पत्नी असूनही, ऐश्वर्या राज यांनी ज्याप्रकारे व्यासपीठावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, ते भावी पिढीसाठी एक आदर्श आहे, असं मानलं जात आहे. ऐश्वर्या आता आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत बिहारचे प्रतिनिधित्व करेल. तिथेही ती आपल्या प्रतिभेची छाप पाडेल अशी अपेक्षा आहे.