Chardham Yatra 2024: तुम्ही आजपर्यंत ट्रॅफिक जाम पाहिला असेल. पण, माणसांच्या गर्दीमुळे निर्माण झालेली कोंडी फारशी पाहिली नसेल. यमुनोत्री धामचे दरवाजे उघडताच पायी जाणाऱ्या भाविकांची या मार्गावर मोठी गर्दी झालीय. भाविकांना कित्येक तास एकाच जागेवर मोठ्या अडचणीत उभं राहवं लागत आहे. पोलीस आणि प्रशासन ही गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, त्यांच्या नियोजनातील कमतरता जगासमोर आलीय. मोठ्या संख्येनं दर्शनासाठी जमा झालेल्या भाविकांचं व्यवस्थापन करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
5 तासांनंतर नियंत्रण
बडकोटचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी मुकेश रमोला यांनी पोलीस कर्मचारी आणि काही तरुणांच्या मदतीनं गर्दीवर नियंत्रण मिळवलं. पण, त्यानंतरही इथं जाम कायम आहे. दोन किलोमीटरपर्यंत भाविकांचा जाम आहे. या गर्दीमुळे यात्रेच्या व्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलीस, होमगार्ड तसंच पीआरडी जवान पहिल्या दिवशी यमुनोत्री धामला पोहचू शकले नाहीत. बहुतेक कर्मचारी आज (11 मे) यमुनोत्रीला रवाना झाले आहेत. यात्रेतील व्यवस्थेवर भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
भाविकांची नाराजी
यमुनोत्री धामला आलेल्या भाविकांनी येथील व्यवस्था खराब असल्याचं सांगितलं. किमान एक रांग लावण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. दर्शनासाठी एकाचवेळी 50 जणांना सोडण्यात येतं, त्यामुळे काहीही दिसत नाही अशी माहिती कुलूमधून आलेल्या एका भाविकानं दिली. तर, दोन किलोमीटरपर्यंत जाम आहे. पोलीस कुठंही दिसत नाहीत. भाविक त्रस्त झाले आहेत. प्रशासन संपूर्ण अपयशी ठरलंय. त्यांनी तातडीनं ही परिस्थिती सुधारण्याची गरज आहे, असं मत एका स्थानिकानं व्यक्त केलं.
उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यात 13 मे पर्यंत पावसाचा इशारा हवामान विभागानं (Uttarakhand Weather Forecast) दिला आहे. 11 ते 13 मे दरम्यान राज्यात पाऊस होईल, अशी माहिती उत्तराखंड हवामान विभागाचे संचालक बिक्रम सिंह यांनी दिली.
( नक्की वाचा : देशात हिंदूच्या लोकसंख्येत घट, मुसलमानांची लोकसंख्या 43 टक्के वाढली )
23 लाख भाविकांचे रजिस्ट्रेशन
चारधाम यात्रा सुरु होताच रजिस्ट्रेशनची संख्या 23 लाखांपर्यंत पोहोचली आहे. शुक्रवारी (10 मे) संध्याकाळी चार वाजेपर्यंत चारधाम यात्रेसाठी 23 लाख 57 हजार 396 जणांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यामध्ये केदारनाथ धामसाठी 8 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी रजिस्ट्रेशन केलंय. बद्रिनाथ धामसाठी 7 लाख 10 हजार 192, यमुनोत्रीसाठी 3 लाख 68 हजार 302, गंगोत्री धामसाठी 4 लाख 21 हजार 205 आणि हेमकुंड साहिबसाठी 50 हजार 604 जणांनी रजिस्ट्रेशन केलंय.