Chhattisgarh Accident News : छत्तीसगडमध्ये ट्रक आणि ट्रेलरच्या भीषण अपघाताता13 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये 10 महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे. रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावर सारागावजवळ लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रकने ट्रेलरला धडक दिल्याने ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथिया छट्टी येथून एका कार्यक्रमात सहभागी होऊन ट्रक परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रायपूरचे जिल्हाधिकारी गौरव सिंह म्हणाले की, जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
गाडीत 50 हून अधिक लोक प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. अपघातानंतर, सर्वत्र मदतीसाठी हाक मारली जात होती.