विष्णूभक्त असाल तर देवालाच काहीतरी करायला सांगा! सरन्यायाधीश गवईंनी याचिकाकर्त्याला झापले

CJI BR Gavai: मध्य प्रदेशातील जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या खजुराहो मंदिर परिसरात जवारी मंदिर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

मध्य प्रदेशातील प्रसिद्ध खजुराहो मंदिरात भगवान विष्णूची 7 फूट उंचीची मूर्ती पुन्हा बसवण्याची मागणी करणाऱ्या एका भक्ताला सुप्रीम कोर्टाने चांगलंच झापलं आहे. राकेश दलाल नावाच्या याचिकाकर्त्याने दाखल केलेली याचिका ही निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे म्हणत कोर्टाने याचिका फेटाळून लावली. कोर्टाने याचिकाकर्त्याची याचिका फेटाळून लावताना म्हटले की, जर तुम्ही भगवान विष्णूचे भक्त असल्याचे म्हणत असाल तर देवालाच काहीतरी करायला सांगा. .

प्रकरण काय आहे ? 

मध्य प्रदेशातील जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या खजुराहो मंदिर परिसरात जवारी मंदिर आहे. या मंदिरामध्ये भगवान विष्णूची 7 फुटांची मूर्ती पुनर्स्थापित करावी अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयामध्ये राकेश दलाल नावाच्या याचिकाकर्त्याने ही याचिका केली होती. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी करण्यात आली होती. याचिकेमध्ये मागणी करण्यात आली होती की, भगवान विष्णूच्या सध्याच्या मूर्तीचा काही भाग हा तुटला असून ही मूर्ती पुन्हा नीट करावी आणि तिची याच मंदिरात पुनर्स्थापना करण्यात यावी.    

कोर्टाने काय म्हटले ?

सुप्रीम कोर्टाने म्हटले की याचिकाकर्ते जी मागणी करत आहेत ती पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारी बाब आहे, त्यामुळे याचिकाकर्ता करत असलेली मागणी योग्य आहे अथवा नाही याबाबतचा निर्णय पुरातत्व विभागाने घ्यायचा आहे. जवारी मंदिर हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात येते. न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली ही याचिका ही निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका असल्याचे म्हटले. जनहित याचिकांना Public Interest petition म्हणतात. याचिकाकर्त्याची ही याचिका म्हणजे  Publicity Interest Litigation आहे असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने पुढे म्हटले की याचिकाकर्त्याने आपण भगवान विष्णूचे भक्त असल्याचे म्हटले आहे, भक्ताने देवाचा धावा करावा आणि त्यालाच याप्रकरणी काहीतरी कर अशी विनवणी करावी. 

हरकत नसल्यास भगवान शंकराची आराधना करा!

कोर्टाने याचिकाकर्त्यांना उद्देशून म्हटले की, याचिकाकर्ते भगवान विष्णूचा भक्त  आहे, त्यांना भगवान शंकराची आराधना करण्यात काही आक्षेप नसेल तर त्यांनी तिथे जाऊन भगवान शंकराची पूजा करावी. खजुराहोमध्ये एक मोठे शिवलिंग असून, ते पाहण्यासारखे आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article