CJI BR Gavai Retirement Plan: न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदांवरून निवृत्त झाल्यावर सरकारी पदे स्वीकारल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी घडली आहेत. जेव्हा जेव्हा असे प्रकार समोर आले, तेव्हा न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले. मात्र, त्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाली. सध्या भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई आहेत. त्यांनी 14 मे 2025 रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. निवृत्त झाल्यावर बी. आर. गवई काय करणार, ते कोणते सरकारी पद स्वीकारणार का, या सर्व प्रश्नांवर त्यांनी शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट केली.
शुक्रवारी महाराष्ट्रातील आपल्या वडिलोपार्जित गावी पोहोचलेल्या बी. आर. गवई यांनी सांगितले की, ते निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय पद स्वीकारणार नाहीत. निवृत्तीनंतर ते गावात वेळ घालवतील, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.
(नक्की वाचा : सरन्यायाधीश पुत्राच्या साधेपणाने भारावले अमरावतीकर , वडिलांच्या कार्यक्रमात ज्योतिरादित्यनं वेधलं लक्ष )
सरन्यायाधीश झाल्यावर पहिल्यांदाच गावी आगमन
सरन्यायाधीश झाल्यावर बी. आर. गवई हे पहिल्यांदाच आपल्या वडिलोपार्जित दारापूर गावात पोहोचले होते. तिथे त्यांनी आपल्या वडिलांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारक स्थळी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. गावात पोहोचताच त्यांनी आपल्या बालपणीच्या घराला भेट दिली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले की, ते निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नाहीत. तसेच, निवृत्तीनंतर ते आपला अधिकतर वेळ दारापूर, अमरावती आणि नागपूरमध्येच घालवणे पसंत करतील, असेही त्यांनी सांगितले.
सरन्यायाधीशांच्या गावात आगमनामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी मुख्य न्यायाधीशांचे स्वागत केले. या प्रसंगी त्यांनी गावातील माती आणि बालपणाशी संबंधित आठवणी भावुक होऊन सर्वांशी शेअर केल्या.