काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपने आजवरचा सगळ्यात मोठा आरोप केला आहे. भाजप खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. राहुल हे देशातील सगळ्यात मोठे गद्दार असल्याचाही आरोप पात्रा यांनी केला आहे. संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी भारताविरोधात षडयंत्र रचणाऱ्या त्रिकोणाबद्दल माहिती दिली. या त्रिकोणाचा एक कोण हा राहुल गांधी असल्याचा आरोप पात्रा यांनी केला आहे. राहुल गांधी यांना आपण देशद्रोही आणि गद्दार का म्हणतोय हे पात्रा यांनी सविस्तरपणे सांगितले.
राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस यांचे कनेक्शन!
2 डिसेंबर रोजी फ्रान्समधील एका वर्तमानपत्राने एक बातमी प्रसिद्ध केली होती. 'द हिडन लिंक्स बिटवीन अ जायंट ऑफ इन्व्हेस्टीगेटीव्ह जर्नालिझम अँड द युएस गव्हर्नमेंट ' या वृत्तामध्ये आरोप करण्यात आला होता की जॉर्ज सोरोस यांनी OCCRP नावाच्या संस्थेला अर्थसहाय्य केले होते. भाजपने आरोप केला आहे की अमेरिकेतील उद्योपती जॉर्ज सोरोस हे सातत्याने भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा अजेंडा चालवत असतात. सोरोस आणि OCCRP यांच्यासोबत राहुल गांधी यांनीही हातमिळवणी केली असून हा त्रिकोण भारताला अस्थिर करण्याचे काम करत असल्याचा आरोप पात्रांनी केला आहे.
OCCRP ही एक जागतिक माध्यम संस्था आहे. या संस्थेने प्रकाशित केलेल्या बातम्या जगभरातील कोट्यवधी लोकं वाचत असतात. जॉर्ज सोरोस यांची ओपन सोसायटी फाऊंडेशन ही या संस्थेला अर्थपुरवठा करते. अर्थपुरवठा करणाऱ्यांच्या हिताच्या बातम्यात OCCRP प्रकाशित करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राहुल गांधी हे याच संस्थेने प्रकाशित केलेल्या बातम्यांचा आधार घेऊन आरोप करत असतात असा भाजपने आरोप केला आहे. एकप्रकारे राहुल गांधी हे OCCRPच्या तालावर नाचत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस एकच आहेत!
संबित पात्रा यांनी म्हटले की OCCRP ला ठेच लागली की राहुल गांधी विव्हळतात. राहुल गांधींना ठेच लागली तर OCCRP रडते. राहुल गांधी आणि OCCRP वेगवेगळे असले तरी त्यांचा आत्मा एकच आहे असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे. पात्रा यांनी या राहुल गांधी, सोरोस आणि ओसीसीआरपी यांच्यातील संबंध उलगडून सांगताना म्हटले की, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सलील शेट्टी सहभागी झाले होते. सलील शेट्टी हे जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष आहेत.