काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांना काँग्रेसच्या वतीने पत्र लिहून याबाबत माहिती देण्यात आली आहे. विरोधी नेतेपदामुळे राहुल गांधी यांच्याकडे आता कॅबिनेट दर्जा असणार आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेते करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीची बैठक झाली. ज्यात जवळपास सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. यामध्ये विरोधी पक्षनेत्याबाबत चर्चा झाली आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्याबाबत प्रोटेम स्पीकरना पत्र देण्यात आले.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने होत होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला. यानंतर राहुल गांधी यांनीही याबाबत निर्णय घेण्यासाठी पक्षाकडे काही वेळ मागितला होता.
काँग्रेसला मिळेल ताकद
राहुल गांधी यांच्या विरोधी पक्षनेते बनल्याने काँग्रेसला नवी ऊर्जा आणि ताकद मिळू शकते. यामुळे त्यांना मित्रपक्षांशी अधिक चांगला समन्वय साधण्यास देखील मदत होईल. याशिवाय लोकसभेत भाजपवर हल्लाबोल करण्यासाठी इंडिया आघाडीकडून मजबूत चेहरा मिळणार आहे.
तब्बल 10 वर्ष रिक्त होतं पद
इंडिया आघाडीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत. जवळपास 10 वर्षांनंतर लोकसभेत विरोधी पक्षनेता असणार आहे. 2014 पासून हे पद रिक्त होते. सुषमा स्वराज 2009 ते 2014 या काळात लोकसभेच्या शेवटच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. परंतु 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत कोणत्याही विरोधी पक्षाचे 54 खासदार निवडून आले नाहीत. नियमांनुसार विरोधी पक्षनेता होण्यासाठी लोकसभेच्या एकूण संख्येच्या 10 टक्के म्हणजेच 54 खासदार असणे आवश्यक आहे.