Union Minister CR Patil Claims Chhatrapati Shivaji Maharaj was Patidar: केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपामधील बडे नेते सीआर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी शिवराय हे पाटीदार समाजाचे होते, असे वक्तव्य केले.
महाराष्ट्रात काही दिवसांमध्ये 29 महानगरपालिका निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर पाटील यांनी केलेल्या या विधानाचे राज्यातील निवडणूक प्रचारात जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
संजय राऊत आणि अजित पवार यांची टीका
सीआर पाटील यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रातील नेत्यांनी तीव्र शब्दात आक्षेप घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे.
दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या विधानाचा समाचार घेतला आहे. शिवाजी महाराजांची वंशावळ संपूर्ण जगाला आणि सर्व भारतीयांना नीट माहिती आहे, त्यामुळे अशा प्रकारचे चुकीचे वक्तव्य करणे अत्यंत अयोग्य आहे, अशा शब्दात पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
कोण आहेत सीआर पाटील?
सीआर पाटील यांचे मूळ जळगाव जिल्ह्यातील पिंपरी अकारौत येथील आहे, मात्र त्यांचे संपूर्ण शिक्षण आणि वास्तव्य गुजरातच्या सुरतमध्ये झाले आहे. त्यांनी सुमारे 14 वर्षे पोलीस दलात सेवा बजावली होती, मात्र शिस्तभंगाच्या कारवाईमुळे त्यांना सेवेतून मुक्त व्हावे लागले होते. त्यानंतर 1991 मध्ये त्यांनी नवगुजरात टाईम्स नावाचे दैनिक सुरू करून प्रसारमाध्यम क्षेत्रात पाऊल ठेवले. गुजरातमध्ये भाजपचे चाणक्य म्हणून त्यांची ओळख असून सध्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय जलशक्ती मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
( नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे )
पाटीदार समाजाचे महत्त्व आणि प्रभाव
पाटीदार समाज हा गुजरातमधील सर्वात मोठा आणि प्रभावशाली बहुसंख्याक समाज मानला जातो. प्रामुख्याने जमीनधारक आणि शेती करणारा हा समाज असून यामध्ये लेऊवा आणि कडवा पाटीदार असे दोन मुख्य गट आहेत.
गुजरातच्या राजकारणावर या समाजाचा मोठा प्रभाव असून कोणत्याही निवडणुकीचे निकाल बदलण्याची क्षमता या समाजात आहे. गेल्या काही वर्षांत या समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन देखील केले होते. आता निवडणुकांच्या तोंडावर पाटील यांनी शिवरायांना या समाजाशी जोडल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.