उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी संचालक वसीम रिझवी यांनी 2021 साली इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. त्यांनी जितेंद्र नारायण सिंह सेंगर हे स्वत:चं नाव ठेवलं आहे. त्यांनी मंगळवारी प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभात स्नान केलं. महाकुंभात स्नान केल्यानंतर खूप आनंद झाला असल्याची भावना त्यांनी केली. जी व्यक्ती स्वखुशीनं इस्लाम धर्म सोडून सनातन धर्मात प्रवेश करेल त्याचं स्वागत केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर इस्लाम धर्म सोडून सनातन धर्मात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण एका संघटना बनवत असल्याचं त्यांनी सांगितलं. या संस्थेच्या माध्यमातून या लोकांना लहान-मोठा उद्योग सुरु करण्यास मदत केली जाणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जितेंद्र सेंगर यांनी यावेळी सांगितलं की, 'मी आज प्रयागराजमधील महाकुंभात स्नान केले. मला खूप आनंद झाला. या पवित्र भूमीवरील मुसलमानांना मी आवाहन करतो की त्यांनी सनातन धर्मात वापसी करण्यावर विचार करावा. मी माझ्या मित्रांसाठी संघटना बनवत आहे. त्या माध्यमातून सनातन धर्मात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मुस्लीम कुटुंबाला दर महिन्याला तीन हजार रुपये मदत केली जाईल. ते पूर्णपणे स्थिर होत नाहीत, तोपर्यंत ही मदत दिली जाईल. '
ते पुढे म्हणाले की, 'इस्लाम सोडून जे सनानत धर्मात येणाऱ्या लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यांना लहान-मोठ्या उद्योगांशी जोडण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला कट्टर आणि जिहादी मानसिकतेमधून बाहेर पडावं लागेल आणि स्वखुशीनं सनातन धर्मात परत यावं लागेल. सनातन धर्म तुमचे स्वागत करत आहे.'
( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
आधी सनातनी बनले नंतर जात बदलली
वसीम रिझवी यांनी 2021 मध्ये इस्लाम धर्म सोडून सनातन धर्मात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:चं नाव जितेंद्र नारायण सिंह त्यागी ठेवलं होतं.त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, 'माझी जेव्हा इस्लाममधून हकालपट्टी करण्यात आली त्यावेळी कोणत्या धर्मात प्रवेश करायचा हे माझे स्वातंत्र्य होते. पण, मी सनातन धर्माची निवड केली. कारण, तो जगातील पहिला धर्म आहे. त्यामध्ये जितका चांगुलपणा आहे तितका जगातील कोणत्याही धर्मात नाही.
जितेंद्र सिंह यांनी सनातन धर्म स्विकारल्यानंतर सुरुवातीला स्वत:ला ब्राह्मण असल्याचं जाहीर केलं होतं. पण, ते तिथं थांबले नाहीत. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी स्वत:ची जात बदलली आणि राजपूत झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:चं नाव जितेंद्र नारायण सिंह सेंगर असं ठेवलं.