Cough Syrup Case: मध्य प्रदेश (MP) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) गेल्या काही दिवसांपासून कफ सिरपमुळे 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ होणाऱ्या मुलांच्या मृत्यूमुळे सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 'जीव वाचवणारे औषध' विष का ठरत आहे? असा त्यांना प्रश्न पडलाय. लांच्या मृत्यूनंतर सरकारने कफ सिरपच्या संपूर्ण बॅचवर बंदी घातली. तसेच, संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या कफ सिरपला तपासणीसाठी पाठवले होते, ज्याचा अहवाल आता समोर आला आहे.
दिल्लीतील CDSCO, पुण्यातल्या व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट आणि मध्य प्रदेश (MP) सरकारने 9 नमुन्यांची (samples) तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीत कोणत्याही नमुन्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. आता राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. दुसरीकडे, या प्रकरणी सरकारकडून एक सल्ला (Advisory) देखील जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये, 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सिरप न देण्याची सूचना करण्यात आलीय.
आरोग्य मंत्रालयाने काय सांगितलं?
- डायरेक्टर जनरल हेल्थ सर्व्हिस (DGHS) डॉ. सुनीता शर्मा यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ही सूचना दिली आहे. त्यानुसार
- मुलांमधील बहुतेक खोकल्याची समस्या आपोआप बरी होते आणि त्यासाठी औषधाची गरज नसते.
- 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला किंवा सर्दीचे सिरप बिलकुल देऊ नका.
- 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्येही या औषधांचा वापर सामान्यतः करू नका. 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना सिरप तेव्हाच द्या जेव्हा डॉक्टर सल्ला देतील.
- औषध योग्य प्रमाणात आणि कमीत कमी दिवसांसाठी दिले जावे आणि एकाच वेळी अनेक औषधांचा वापर करू नये.
- सामान्य जनतेलाही सांगितले जावे की त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना कोणतेही सिरप देऊ नये.
- डॉक्टरांनी सिरप देण्याऐवजी, सर्वात आधी औषधांशिवाय आराम मिळवण्याच्या उपायांबद्दल मुलांना सांगावे.
- मुलांना पुरेसे पाणी आणि पातळ पदार्थ (liquid), विश्रांतीचा सल्ला आणि घरगुती तसेच भाप घेणे, कोमट पाणी पिणे यांसारखे सहयोगी उपाय (supportive measures) करण्याचा सल्ला द्यावा.
( नक्की वाचा : Akshay Kumar Video : अक्षय कुमारच्या मुलीला 'Nude' फोट मागितले, अभिनेत्यानं सांगितला अनुभव, मुख्यमंत्र्यांना म्हणाला...)
DGHS ने आरोग्य संस्थांना दिलेले निर्देश
- सर्व सरकारी आणि खासगी आरोग्य संस्थांनी हे सुनिश्चित करावे की केवळ चांगल्या गुणवत्तेच्या (Good Quality) कंपन्यांकडूनच औषधे खरेदी केली जावीत.
- औषधांमध्ये केवळ फार्मास्युटिकल ग्रेड (Pharmaceutical Grade) सामग्रीचाच वापर व्हावा.
- डॉक्टर आणि फार्मासिस्टना योग्य सल्ला आणि औषध देण्याच्या नियमांविषयी जागरूक केले जावे.
- या निर्देशांचे केंद्रापासून ते जिल्हा स्तरावरील रुग्णालय, आरोग्य केंद्र आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पालन केले जावे.
प्राथमिक तपासणी अहवालात कफ सिरपला 'क्लीन चिट' मिळाल्यानंतर आता प्रश्न हा आहे की, मुलांच्या मृत्यूचे कारण काय होते? यावर सध्या कोणाकडेही कोणते उत्तर नाही. अजूनही तपासणी सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे चिमुकल्यांचा जीव जाण्याची मालिका कधी थांबणार? या प्रकरणातील दोषी कोण आहेत? त्यांच्यावर कधी आणि काय कारवाई होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.