Ditwah Cylcone Latest News : श्रीलंकेत 'दित्वा'चक्रीवादळानं धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुराच्या पाण्यामुळे श्रीलंकेत हाहाकार उडाला आहे. वादळाच्या तडाख्यात 56 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण बेपत्ता आहेत. या वादळामुळे श्रीलंकेतील अनेक जिल्ह्यांमधील जवळपास 44000 लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.तर अनेक ठिकाणं जलमय झाली आहेत. आता हे वादळ भारतातही धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरातून उत्तरी तमिळनाडू,पद्दुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ चक्रीवादळ ‘दित्वा' येत्या 30 नोव्हेंबरला सकाळच्या वेळेत पोहोचण्याची शक्यता आहे.
भारतात कोणत्या ठिकाणी पोहोचणार दित्वा चक्रीवादळ?
भारतीय हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, हे वादळ वेगाने पुढे सरकत आहे आणि 30 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत उत्तर तमिळनाडू,पद्दुचेरी आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनारी भागाजवळ बंगालच्या उपसागरात पोहोचेल.आयएमडीने अनेक राज्यांसाठी पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे. तामिळनाडू आणि पद्दुचेरीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी 20
सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. 30 नोव्हेंबरला पावसाची तीव्रता थोडी कमी होण्याची शक्यता आहे.दर काही ठिकाणी दमदार पाऊस पडू शकतो.
किनारी भागांमध्ये ताशी 60 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहणार
दक्षिण किनारी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा येथे शुक्रवारपासून पावसाची सुरुवात होऊ शकते.येथे 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसच 1 ते 2 डिसेंबरलाही जोरदार पाऊस पडू शकतो. केरळ आणि लक्षद्वीप परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळामुळे विविध किनारी भागांमध्ये ताशी 60 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने १ डिसेंबरपर्यंत समुद्रात मासेमारीवर पूर्ण बंदी घातली आहे. आधीपासून समुद्रात असलेल्या बोटींना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांना घरात सुरक्षित राहण्याची सूचनाही देण्यात आली आहे. चक्रीवादळ ‘दित्वा' सध्या श्रीलंकेच्या किनारी भागात आणि दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे. गेल्या 6 तासांत हे वादळ ताशी 10 किलोमीटर वेगाने उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world