संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानमधील अण्वस्त्राच्या सुरक्षेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकिस्तानमधील अण्वस्त्रांवर आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्थेनं (IAEA) देखरेख ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ऑपरेशन सिंदूर'नंतर जम्मू-काश्मीरच्या पहिल्या दौऱ्यात श्रीनगरमध्ये जवानांशी संवाद साधताना ते बोलत होते. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांनी स्वत:ला कुठेही सुरक्षित समजू नये, हे या ऑपरेशननं स्पष्ट केलं आहे, असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ते पुढे म्हणाले की, 'मला संपूर्ण जगासमोर एक प्रश्न उपस्थित करायचा आहे की,'एका बेजबाबदार आणि असभ्य देशाच्या हातात आण्विक शस्त्रे सुरक्षित आहेत का?,' पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) देखरेख ठेवावी.
काय आहे IAEA ?
IAEA ला 'न्यूक्लियर वॉचडॉग' म्हटले जाते. IAEA ही एक आंतरसरकारी संस्था आहे. अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरला ती प्रोत्साहन देते. अण्वस्त्रांचा कोणत्याही लष्करी उद्देशांसाठी वापर रोखणे हे त्याचे ध्येय आहे. या संस्थेची स्थापना 1957 साली करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अंतर्गत जगातील 'शांततेसाठी अणू' संस्था हा IAEA च्या स्थापनेचा उद्देश होता.
( नक्की वाचा : Operation Sindoor : चिनी यंत्रणा जाम करत भारतानं फक्त 23 मिनिटांमध्ये कापले पाकिस्तानचे नाक! वाचा Inside Story )
संरक्षण मंत्री श्रीनगरमध्ये
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एकूण सुरक्षा परिस्थिती, विशेषतः नियंत्रण रेषा (LOC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सध्याच्या सुरक्षा परिस्थितीच्या विविध पैलूंवर संरक्षण मंत्र्यांना माहिती दिली. संरक्षण मंत्री श्रीनगरमधील भारतीय लष्कराच्या XV कॉर्प्समध्ये एकूण परिस्थिती तसेच आघाडीवरील सैनिकांच्या युद्ध तयारीचा आढावा घेतील.
भारतीय सैन्यानं 7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केले, त्यानंतर पाकिस्तानने 8, 9 आणि 10 मे रोजी भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या कारवाईला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने 10 मे रोजी आठ पाकिस्तानी विमानतळांना क्षेपणास्त्रे आणि इतर लांब पल्ल्याच्या शस्त्रांनी लक्ष्य केले. १० मे रोजी दुपारी दोन्ही बाजूंमध्ये चर्चेनंतर युद्धविरामावर सहमती झाली आणि लष्करी कारवाई थांबवण्यात आली.