दिल्लीत लाल किल्ल्या जवळ सोमवारी संध्याकाळी स्फोट झाला. i20 या गाडीत हा स्फोट झाला. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाने दिल्ली हादरली. एकच खळबळ उडाली. पोलीस यंत्रणांबरोबर गुप्तचर यंत्रणाही अलर्ट मोडवर आल्या. तपासाची सुत्र वेगाने फिरायला लागली. त्यानंतर धाड सत्रासोबत अटक सत्रही सुरू झालं. त्यातून एक एक नाव समोर येत आहे. त्यातील एक नाव आहे डॉक्टर शाहीना. याच डॉक्टर शाहीना हिला हरीदाबाद मधून अटक करण्यात आली आहे. तिच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय तीच या स्फोटामागे मास्टरमाईंड असल्याचं बोललं जात आहे.
फरीदाबाद येथून डॉक्टर शाहीना नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ती दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या महिला विंगची, 'जमात-उल-मोमिनात'ची, भारतात 'कमांडर' म्हणून काम करत होती. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, शाहीनाला भारतातील महिलांना कट्टरपंथी विचारांशी जोडणे आणि संघटनेसाठी त्यांची भरती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ही डॉक्टर महिला विंग जैशच्या नवीन रणनितीचा एक भाग आहे.
ज्यामध्ये महिलांना मानसिक युद्ध, प्रचार आणि आर्थिक व्यवहार (फंडिंग) यांसारख्या कार्यांसाठी वापरले जात आहे. पाकिस्तानमध्ये मसूद अजहरची बहीण सादिया अजहर या विंगचे नेतृत्व करत आहे. सादियाचा पती, युसूफ अजहर, हा कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक होता. धार्मिक जबाबदाऱ्या आणि 'जिहाद' च्या नावाखाली महिलांना संघटनेच्या कार्यात सामील करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. भारतात डॉक्टर शाहीनासारख्या व्यक्तींद्वारे हे जाळे पसरवण्याची योजना आखण्यात आली होती.
दिल्ली स्फोट प्रकरणी आतापर्यंत 3 संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत. दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पुलवामा जिल्ह्यातील 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये तारीक अहमद मलिक (एटीएम गार्ड), तसेच भाऊ आमिर रशीद आणि उमर रशीद यांचा समावेश आहे. स्फोटात वापरलेल्या कारचा मालक तारीक याने ती कार डॉ. उमर यू नबीला दिली होती. डॉ. उमर यू नबी हा स्फोटात मारला गेलेला संशयित आहे. तो फरीदाबादमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिकवत होता. डॉक्टर शाहीना ज्या अल फला युनिव्हर्सिटीशी संबंधित होती, ते विद्यापीठ 70 एकर परिसरात पसरलेले आहे. तेथे अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. शाहीनाने इतर विद्यार्थी किंवा सहकाऱ्यांचेही रेडिकलायझेशन केले का, या दिशेने तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेले अनेक डॉक्टर एका टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून पाकिस्तानमधील हँडलरच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळाली आहे.