Delhi CM Attack Case : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या तपासात आरोपी राजेश खिमजीने केलेल्या विचित्र वक्तव्यांमुळे पोलीसही गोंधळून गेले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपी चौकशीदरम्यान सतत अशा गोष्टी सांगत आहे, ज्यामुळे तपास भरकटवण्याचा प्रयत्न होत स्पष्ट होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशने सांगितलं की तो शिवमंदिर बांधून पूजा करतो. त्याने असा दावा केला की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला शिवलिंगात भगवान शिवाच्या भैरव रूपाचे दर्शन झाले. राजेशच्या मते, भैरवाच्या रूपात आलेल्या कुत्र्यानेच त्याला दिल्लीला जाऊन आपलं म्हणणं मांडण्याचा आदेश दिला.
हल्लेखोर रेखा गुप्तांपर्यंत कसा पोहोचला?
पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं की, राजेश सोमवारी आपल्या घरातून उज्जैनला पोहोचला, जिथे त्याला पुन्हा एकदा भैरवाच्या रूपात आलेल्या कुत्र्याने दिल्लीला जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर तो विना तिकीट ट्रेनने नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आला. दिल्लीला आल्यावर त्याने एका व्यक्तीला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या घराचा पत्ता विचारला आणि मेट्रोने निघाला. पण तो चुकीच्या स्टेशनवर उतरला आणि वाटसरूंना विचारून रिक्षाने मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानी पोहोचला. त्याने रिक्षावाल्याला 50 रुपये दिले.
( नक्की वाचा : Nora Fatehi : बायकोनं नोरा फतेही सारखं दिसावं म्हणून 3 तास जिम करायला लावायचा नवरा ! वाचा काय आहे प्रकरण? )
पोलिसांच्या चौकशीत राजेशने सांगितलं की, तो मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून कुत्र्यांना बाहेर न काढण्याचं आवाहन करण्यासाठी आला होता. पण त्याचा आरोप आहे की, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्याचं म्हणणं ऐकलं नाही. यामुळे संतापून त्याने मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला.
गुजरातला परत जायचं होतं
राजेशच्या दाव्यानुसार त्याला समस्या सांगितल्यानंतर त्याला संध्याकाळच्या ट्रेनने गुजरातला परत जायचं होतं. पोलिसांच्या तपासात हे देखील समोर आलं आहे की, राजेश या वर्षी मे महिन्यात अयोध्येला गेला होता, जिथे एका मुद्द्यावर धरणं धरत असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला मारहाण केली होती. सध्या, दिल्ली पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत आणि या हल्ल्यामागे काही मोठं कारण आहे की, ही फक्त त्याच्या वैयक्तिक मानसिकतेचा परिणाम आहे, याची तपासणी करत आहेत. आरोपीची विधानं अनेकदा विसंगत आणि काल्पनिक असल्यामुळे मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेतली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.