Delhi Metro Magenta Line Driverless दिल्ली मेट्रोची मजेंटा लाईन 1 जुलैपासून ड्रायव्हरलेस होणार आहे. या लाईनवरील सर्व मेट्रो ड्रायव्हरशिवाय धावणार आहेत. जून महिन्याच्या अखेरपर्यंत या मेट्रो पूर्ण ऑटोमेटेड होतील. या मार्गावरील मेट्रो रेल्वेमधील ड्रायव्हरचे केबिन देखील आता हटवण्यात येणार आहेत. त्याचा उपयोग प्रवाशांना बसण्यासाठी केला जाईल. सध्या ड्रायव्हरलेस मेट्रोमध्ये ट्रेन अटेंडेंटची व्यवस्था आहे. 1 जुलैपासून त्यांना देखील हटवण्यात येणार आहे. मजेंटा लाईननंतर पिंक लाईन देखील ड्रायव्हरलेस करण्याची दिल्ली मेट्रोची योजना आहे. दिल्ली मेट्रोचे ऑटोमेटेड नेटवर्क सध्या जवळपास 97 किलोमीटर लांब मजेंटा आणि पिंक लाईनवर उपलब्ध आहे. हे सर्व वाचल्यानंतर ड्रायव्हरशिवाय मेट्रो कशी धावणार? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. त्याचं उत्तर आम्ही देणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसं चालतं कामकाज?
ड्रायव्हरलेस ट्रेन ऑपेरेशन (DTO) मोडच्या माध्यमातून चालवली जाते. यामध्ये मेट्रोचं सर्व नियंत्रण DMRC च्या माध्यमातून केलं जातं. त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. ही रेल्वे सिग्नलिंग टेक्नोलॉजीच्या (CBTC) माध्यमातून चालवली जाते. या रेल्वेच्या उपकरणांची देखरेख रियल टाईममध्ये करण्यात येते. ड्रायव्हरलेस रेल्वेच्या तंत्राचं एक पॅरामीटर आहे. त्याला ग्रेड्स ऑफ ऑटोमेशन (GOA) असं म्हंटलं जातं.
- जीओए टेक्नॉलजीच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे ड्रायव्हर चालवतो.
- जीओए टेक्नॉलजीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात गेट उघडणे आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्येच ड्रायव्हर रेल्वे चालवतो. अन्य सर्व कालावधीमध्ये ही रेल्वे ऑटोमेटीक चालते.
- जीओए टेक्नॉलजीच्या चौथ्या टप्प्यात ही रेल्वे संपूर्ण ऑटोमेड असते.
ट्रेंडींग बातमी - जॉर्जिया मेलोनींनी PM मोदींसोबत शेअर केला व्हिडिओ, मोदींकडूनही आलं उत्तर
केबिन हटवण्यास सुरुवात
दिल्ली मेट्रोचं व्यवस्थापन करणाऱ्या DMRC कडं या प्रकारचं तंत्रज्ञान 2017 पासून आहे. आता मजेंटा लाईनवर संपूर्ण फोर्थ टेक्नॉलजीच्या माध्यमातून मेट्रो चालवण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबतचे ट्रायल सुरु होते. 'टाईम्स ऑफ इंडिया' नं DMRC च्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार आत्तापर्यंत 15-16 मेट्रोमधील ड्रायव्हर केबिन हटवण्यात आलं आहे. या मेट्रोमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आता जास्त जागा झाली आहे. योजनाबद्ध पद्धतीनं ट्रेन अटेंडेंटची संख्या कमी करण्यात येईल. सध्या तीन-चार रेल्वेसाठी एक अटेंडेंट ठेवला जाऊ शकतो.
दिल्लीमध्ये 2020 साली मजेंटा लाईनवरील जनकपूरी ते बॉटनिकल गार्डन ही मेट्रो सर्वप्रथम ड्रायव्हरशिवाय धावली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये पिंक लाईनवर (मजलीस पार्क ते शिव विहार) मेट्रो ड्रायव्हरलेस झाली. सुरुवातीच्या टप्प्यात या मेट्रोमध्ये ट्रेन ऑपरेटर असे. आता मजेंटा लाईन संपूर्ण ड्रायव्हरलेस होणार आहे. या मार्गावरील ट्रॅकचे मॉनिटरिंग केलं जाणार आहे. त्यासाठी ट्रॅकवर कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर ऑपरेशन कंट्रोल सेंटरवर अलार्मची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.