Delhi Red Fort Blast Inside Story: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या पार्किंगजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक मोठे आणि धक्कादायक चेहरे समोर येत आहेत. यामागे 'कट्टरपंथी डॉक्टरांचे संपूर्ण नेटवर्क सक्रिय होते आणि त्यांचा उद्देश दिल्लीसह अन्य शहरांनाही हादरवण्याचा होता, हे उघड झाले आहे.
डॉक्टरांची टीम, भयंकर प्लॅनिंग अन् हल्ला..
यामध्ये अनंतनागमधील डॉक्टर आदिल अहमद, फरीदाबादमध्ये प्रचंड दारूगोळा गोळा करणारा डॉक्टर मुजम्मिल शकील आणि तिसरा संशयित हल्लेखोर डॉक्टर उमर मोहम्मद यांचा समावेश आहे. उमर मोहम्मद याच संशयिताने कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच डॉक्टर शाहीनाला फरीदाबादमधून अटक करण्यात आली आहे.
तिच्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 'जमात उल मोमीनात या महिला विंगची भारतमध्ये कमान सोपवण्यात आली होती. नवीन तरुणांची भरती करण्याची जबाबदारीही तिच्यावर होती. या महिला विंगची पाकिस्तानमधील प्रमुख अजहर मसूद याची बहीण सादिया अजहर ही आहे. सादिया अजहरचा पती युसूफ अजहर हा कंदाहार विमान अपहरण कटातील मुख्य सूत्रधार होता.
डॉक्टर आदिल अहमद कोण आहे?
आदिल मोहम्मद हा अनंतनागमधील एका रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर आहे. १९ ऑक्टोबर रोजी त्याने श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे पोस्टर्स लावले होते. सीसीटीव्ही फुटेजवरून त्याची ओळख पटली आणि ६ नोव्हेंबर रोजी त्याला सहारनपूरमधून अटक करण्यात आली. अनंतनाग येथील त्याच्या लॉकरमधून एक रायफल आणि इतर संवेदनशील सामग्री जप्त करण्यात आली. त्याच्याकडूनच फरीदाबादमधील डॉक्टर मुजम्मिल शकीलचा सुगावा पोलिसांना मिळाला।
डॉक्टर मुजम्मिल शकील कोण आहे?
मुजम्मिल शकीलला फरीदाबाद आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत पकडले. फरीदाबादच्या धौज भागात त्याने भाड्याने घेतलेल्या खोलीतून ३६० किलो स्फोटके, २० टाइमर, दोन असॉल्ट रायफली आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर फरीदाबादमधील एका गावात २५६० किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा मोठा साठा सापडला, जो ट्रकने हलवण्याची योजना होती. मुजम्मिल हा पुलवामाचा रहिवासी असून, तो फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीत शिकवत होता. कट्टरपंथी डॉक्टरांच्या या नेटवर्कने देशाला हादरवण्याचा मोठा कट रचला होता, जो वेळीच उघड झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
कार कुठे कुठे फिरली?
दरम्यान, ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार फरिदाबादची असल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधील प्रवाशांची ओळख अद्याप अज्ञात आहे. काल फरिदाबादमध्ये झालेल्या छाप्यापासून बेपत्ता असलेले डॉ. उमर उ. नबी आत असण्याची शक्यता आहे. स्फोटात उमर नबी मारला गेला की बेपत्ता आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही. ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार फरिदाबादहून लाल किल्ल्याकडे प्रवास करत होती. ती बदरपूर सीमेवरून, सराई काले खानमधून आणि नंतर आयटीओमधून लाल किल्ल्यावर पोहोचली, जिथे स्फोट झाला.
Pakistan on Delhi Blast: दिल्लीतील स्फोटाची पाकिस्तानात चर्चा; प्रमुख वृत्तपत्रांनी काय बातमी दिली?
लाल किल्ला स्फोटाची वेळ आणि ठिकाण
- सकाळी ८:१३ वाजता: कारचा फरीदाबादमधून दिल्ली सीमेत प्रवेश.
- सकाळी ८:२० वाजता: ओखला पेट्रोल पंपवर कारची नोंद.
- दुपारी ३:१८ वाजता: कार लाल किल्ला पार्किंग कॉम्प्लेक्समध्ये पोहोचली.
- सायंकाळी ६:२८ वाजता: कार पार्किंगमधून बाहेर निघाली.
- सायंकाळी ६:५२ वाजता: कारमध्ये बॉम्बस्फोट झाला.