Delhi Wind and Rain: दिल्लीमध्ये शनिवारी दुपारनंतर आलेल्या जोरदार वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ रॅपिड मेट्रोच्या न्यू अशोकनगर स्टेशनचे छप्पर उडाले. जोरदार वादळात मेट्रोच्या छतावरील पत्रे दूरवर उडाले. अनेक भागांमध्ये झाडे आणि विजेचे खांब पडले. तर, मध्य दिल्लीतील नवे करीम भागातील आरा कसा रोडवर एका काम सुरु असलेल्या इमारतीची भिंत कोसळली. या ढिगाऱ्याखाली दबून 3 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जखमी झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवे करीम भागात भिंत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर येथे बचावकार्य सुरू करण्यात आले. या दरम्यान ढिगाऱ्याखाली दोन लोकांचे मृतदेह सापडले, तर 4 जखमी अवस्थेत आढळले. जखमींना उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
भिंत कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नवे करीम नगर भागात तीन मजली हॉटेलचे बांधकाम सुरू होते. या हॉटेलच्या बेसमेंटमध्ये बांधकाम सुरू होते. आज अचानक आलेल्या जोरदार वादळ आणि पावसामुळे बेसमेंटची भिंत अचानक कोसळली, ज्यात 6 जण दबले गेले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
(नक्की वाचा : Spy Racket : पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी गेली आणि हेर बनली! ISI एजंट महिला YouTuber सह 6 जणांना अटक )
मेट्रोचे छत उडाले
दिल्लीतील अशोक नगरमधूनही वादळामुळे नुकसानीची माहिती मिळाली आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसात नमो भारतच्या न्यू अशोक नगर मेट्रो स्टेशनचे मोठे नुकसान झाले आहे. वादळात मेट्रो स्टेशनच्या छताचे तुकडे तुकडे झाले आणि ते दूरवर जाऊन पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलीस आणि स्टेशनची देखभाल करणारे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. स्टेशनच्या छताचा मलबा जमा केला जात आहे. खबरदारी म्हणून न्यू अशोक नगर नमो भारत स्टेशनवर ट्रेनची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितले की, जोरदार वादळामुळे न्यू अशोक नगर मेट्रो स्टेशनच्या छतावर लावलेला पत्र्याचा शेड उडाला, जो खूप दूरवर गेला. आजूबाजूच्या लोकांनी कसाबसा जीव वाचवला.
याशिवाय, कनॉट प्लेस परिसरात अनेक झाडे पडली. यात अनेक कार आणि वाहने झाडांखाली दबली गेली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारनंतर दिल्लीत सुमारे 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे अशोक नगर मेट्रो स्टेशनचा शेड उखडला आणि अनेक झाडे पडली.