5 ऑगस्ट रोजी धरालीमध्ये आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीत अनेक लोक बेपत्ता झाले. यामध्ये असेही काही लोक होते, जे पुराच्या थेट तडाख्यातून वाचले. पण वीज आणि नेटवर्क बंद असल्यामुळे त्यांचा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही. संपर्क तुटल्यामुळे त्यांचे कुटुंबीय खूप चिंतेत होते. आता हळूहळू धरालीकडे जाणारे रस्ते सुरू होत आहेत. त्यामुळे, बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्याचे काम सुरू झाले आहे. या घटनेनंतर 'एनडीटीव्ही'च्या टीमने घटनास्थळी पोहोचून एका नेपाळी व्यक्तीशी बोलताना, कसे 26 लोकांचा एक गट बेपत्ता झाला आहे, याबद्दल माहिती घेतली होती. या लोकांनी काही थरारक प्रसंग सांगितले आहेत.
बेपत्ता लोकांचा शोध घेत होते वीर सिंग
रविवारी त्याच व्यक्तीची 'एनडीटीव्ही'च्या टीमसोबत पुन्हा भेट झाली. यावेळी त्याने दिलेली माहिती ही खरोखरच जगाचं कसं आणि वाचायचं कसं हे दाखवून देणारीच होती. नेपाळचे रहिवासी वीर सिंग धरालीतील घटनेनंतर आपल्या 26 बेपत्ता सदस्यांचा शोध घेण्यासाठी दारोदार भटकत होते. ते पायीच धरालीकडे जात होते. पण रस्ता तुटलेला असल्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. पण त्यांनी हिंमत हरली नाही.
सर्व 26 बेपत्ता लोक सुखरूप सापडले
तेव्हा त्यांनी 'एनडीटीव्ही'ला सांगितले होते, की "माझ्या ओळखीचे 26 लोक या घटनेनंतर बेपत्ता आहेत. त्यांचा काहीच पत्ता लागत नाही. प्रशासनही काही सांगू शकत नाही." पण रविवारी वीर सिंग यांनी मोठी आनंदाची बातमी दिली की त्यांचे सर्व 26 सदस्य सुखरूप सापडले आहेत.
आर्मी कॅम्पजवळ रस्ता बांधण्याचे काम करत होते
धरालीमध्ये आलेल्या या नैसर्गिक आपत्तीनंतर बेपत्ता झालेले हे सर्व नेपाळी लोक रस्ते बांधणीचे काम करणारे मजूर होते. हे लोक धराली जवळच्या आर्मी कॅम्पजवळ रस्ता बांधणीचे काम करत होते. पण जेव्हा पूर आला, तेव्हा आर्मीच्या जवानांनी त्यांना तिथून जंगलात पळून जाण्यास सांगितले. त्यांच्यासोबत आर्मीचे काही जवानही जंगलात पळाले.रविवारी वीर सिंग यांनी सांगितले की, आर्मीच्या जवानांनी वेळेवर सतर्क केल्यामुळे हे सर्व लोक जंगलात उंच ठिकाणी पळून गेले आणि त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. आता त्यांचे सर्व लोक सुखरूप आहेत. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती दिली आहे.
आर्मीच्या जवानांनी वाचवले प्राण
यानंतर या सर्व 26 लोकांच्या कुटुंबांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वीर सिंग म्हणाले की, "माझे सर्व लोक सुरक्षित असल्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि आता ते पुन्हा रस्ते बांधणीच्या कामात लागतील आणि मदत करतील." त्यांनी हात जोडून पशुपतिनाथ, गंगा माता आणि सर्व देवी-देवतांचे आभार मानले. धरालीतील आपत्तीमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान सातत्याने खोदकाम करत आहेत आणि बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.