Diwali Celebration in Ayodhya : देशभरात सध्या दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. देशाचा प्रत्येक कोपरा दिव्यांच्या रोशनाईनं उजळला आहे. प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये रामजन्मभूमीच्या ठिकाणी भव्य मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे या दिवाळीला अतिशय महत्त्व आहे. अयोध्येमध्ये दिवाळीची वेगळीच भव्यता आणि मांगल्य जाणवत आहे. ही दिवाळी अनुभवण्यासाठी, दिवाळीमध्ये रामललाचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत.
बुधवारी दिवाळीच्या निमित्तानं शरयू नदीच्या काठावर 25 लाख दिवे लावण्यात आले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद केली जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला दिवा लावून दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभू श्रीराम, माता सीता, आणि लक्ष्मण बनलेल्या कलाकारांसह पुष्पक विमानातून कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले. योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण रथावर सवार झाले. मुख्यमंत्री योगी यांनी तो रथ ओढला. हा रथ रामकथा पार्कमध्ये दाखल झाल्यानंतर भाविकांनी एकच जयघोष केला. जय श्रीरामचा नाद सर्वत्र होत होता.
योगींनी राम-सीता आणि लक्ष्मण यांची आरती केली तसंच राज तिलक लावला. त्यानंतर त्यांनी राम मंदिरामध्ये विशेष पूजा-अर्चना केली. योगींनी त्यानंतर कार्यक्रमाला संबोधित केलं.
500 वर्षांनंतर रामलला विराजमान
मुख्यमंत्री योगी यांनी सांगितलं की, ' हजारो वर्षांपूर्वी 14 वर्षांच्या वनवासानंतर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांचे अयोध्येमधील आगमन आणि रामराज्याच्या सुरुवातीचं स्मरण म्हणून देशभर भक्तांनी घरात दीप लावून आणि फुलांची सजावट करत हा उत्सव सुरु केला. यंदाची दिवाळी ऐतिहासिक आहे. कारण, 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भगवान श्रीरामलला त्यांच्या घरात विराजमान झाले आहेत.'
अयोध्येसारखीच दिवाळी मथुरा-काशीतही व्हावी
मुख्यमंत्री योगी यांनी पुढं सांगितलं की, तुमच्याकडून लावण्यात आलेले दिवे हा सनातन धर्माच्या विश्वासाचं प्रतिक आहे. अयोध्या वासियांना पुढं यावं लागेल. अयोध्येसारखी दिवाळी मथुरा-काशीमध्ये देखील व्हायला हवी.
अयोध्येतील दीपोत्सवात काय खास?
- अयोध्येतील दीपोत्सवात रामकथेमधील प्रसंगावर 11 रथ सजवण्यात आले आहेत.
- या कार्यक्रमात 16 राज्यांमधील 1200 कलाकारांनी सादरीकरण केलं.
- 10 ठिकाणी लोक कलाकारांच्या सादरीकरणासह 84 कोस परिसरातील 200 मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा झाला.
- प्रकाश मार्ग ते अयोध्या धामपर्यंत सजावट करण्यात आली
- शरयू नदीच्या काठावर 25 लाख दिवे लावण्यात आले.
- या दरम्यान लेझर शो आणि लायटिंग देखील करण्यात आली.