पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला हयातीचा दाखला (Life Certificate) सादर करणे बंधनकारक असते, निवृत्तीवेतन सुरळितपणे सुरू राहावे यासाठी हा दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पेन्शनधारकांना हयातीचा दाखला मिळवण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला होता. निवृत्तीवेतनधारकांसाठीच्या कल्याण विभागाने (DoPPW) 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत देशभरात ‘4 थी राष्ट्रव्यापी डिजिटल हयातीचा दाखला मोहीम' आयोजित करण्याची घोषणा केली आहे. ही मोहीम देशातील 1850 हून अधिक शहरे, जिल्हे आणि तालुक्यांमध्ये राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत 2500 पेक्षा जास्त ठिकाणी शिबिरे घेतली जाणार आहेत. या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी DoPPW चे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी नुकतीच एक बैठक बोलावली होती. त्यांनी सांगितले की, या मोहिमेमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), पेन्शन देणाऱ्या बँका, पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशन यांसारख्या अनेक संस्था सहभागी होणार आहेत. मागील वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या मोहिमेत 1.62 कोटी हयातीचे दाखले देण्यात आले होते. या वर्षी ही संख्या अधिक वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
हयातीचा दाखल्यासाठीच्या मोहिमेचा फायदा काय ?
IPPB आपल्या 1.8 लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून देशभरातील 1600 जिल्हा आणि उप-विभागीय पोस्ट ऑफिसमध्ये शिबिरे आयोजित करणार आहे. यामुळे दुर्गम भागातील पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, 19 पेन्शन देणाऱ्या बँका 315 शहरांमधील 900 हून अधिक ठिकाणी शिबिरे घेणार आहेत. 57 पेन्शन वेलफेअर असोसिएशन देखील पेन्शनधारकांना या शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतील. या अभियानात दूरसंचार विभाग, रेल्वे मंत्रालय, संरक्षण मंत्रालय (CGDA) आणि EPFO सारखे संबंधित विभागही देशातील निश्चित ठिकाणी शिबिरांचे आयोजन करतील. यामुळे सर्व पेन्शनधारकांना त्यांचा दाखला सादर करणे सोपे होणार आहे.
कुठल्या राज्यात किती शिबिरे आयोजित केली जाणार ?
उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक (170) शिबिरे असतील, त्यानंतर मध्य प्रदेश (127), बिहार (114), ओडिशा (110), आणि महाराष्ट्रात (106) शिबिरे घेतली जातील. बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (82) शिबिरांसह आघाडीवर आहे, त्याखालोखाल पंजाब नॅशनल बँक (31), बँक ऑफ इंडिया (27), इंडियन बँक (24), आणि बँक ऑफ बडोदा (24) इथे शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.