- भारतातील बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या जलद वाढत आहे
- आर्थिक पाहणी अहवालानुसार तेलंगणातील लठ्ठ महिलांचे प्रमाण वाढून ३०.१ टक्के आणि पुरुषांचे ३२.३ टक्के झाले आहे
- दिल्लीमध्ये महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ४१.३ टक्के तर पुरुषांमध्ये ३८ टक्के इतके नोंदवले गेले आहे
देशातील बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार, भारतात लठ्ठपणाची समस्या वेगाने फोफावत आहेत. यात काही राज्य ही आघाडीवर असल्याचं स्पष्ट झालं आहे. या राज्यातील लोक झपाट्याने लठ्ठपणाचा शिकार होत आहेत. त्यात तेलंगणा, दिल्ली आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. वेळेत प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास हे संकट सामाजिक आणि आर्थिक आव्हाने उभी करू शकते, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-4) च्या तुलनेत तेलंगणात लठ्ठ महिलांचे प्रमाण 28.6 टक्क्यांवरून 30.1 टक्क्यांवर पोहोचले आहे. पुरुषांच्या बाबतीत ही वाढ अधिक असून हे प्रमाण 24.2 टक्क्यांवरून थेट 32.3 टक्क्यांवर गेले आहे. दिल्लीमध्ये 41.3 टक्के महिला आणि 38 टक्के पुरुष लठ्ठपणाचे शिकार आहेत. तर तामिळनाडूत हेच प्रमाण अनुक्रमे 40.4 टक्के आणि 37 टक्के इतके आहे.
नक्की वाचा - Budget 2026: 'बँकिंग गव्हर्नन्स बिल' काय आहे, सामान्यांना त्याचा काय फायदा होईल?
भारतातील एकूण आजारांपैकी 54 टक्के आजार हे अयोग्य आहारामुळे होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. अतिप्रक्रिया केलेले अन्न (Ultra-processed food) आणि साखरेचे वाढते प्रमाण यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याच्या वेगाबाबत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, ही बाब अधिक क्लेशदायक आहे. तुम्ही चविष्ट समोसे किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ आवडीने खाताय? तर थांबा असं म्हणण्याची वेळ आली आहे.
देशातील जनतेचे वजन आता धोक्याच्या पातळीकडे सरकत आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात लठ्ठपणाबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये लठ्ठपणाचा आलेख झपाट्याने उंचावत आहे. यात शहरी भागात सर्वाधिक फटका बसल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. शहरी भागातील 29.8 टक्के पुरुष लठ्ठपणाने त्रस्त आहेत, तर ग्रामीण भागात हे प्रमाण 19.3 टक्के आहे. विशेष म्हणजे, मुलांच्या लठ्ठपणात भारताचा वेग व्हिएतनाम आणि नामिबियानंतर जगात सर्वाधिक आहे. 18 ते 69 वयोगटातील महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 24 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
शारीरिक हालचालींचा अभाव आणि प्रोसेस्ड फूडचे अतिसेवन हे यामागचे मुख्य कारण आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही या विषयावर चिंता व्यक्त केली असून, भारताला आपल्या लोकसंख्येचा फायदा घ्यायचा असेल, तर नागरिकांनी संतुलित आहार घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. देशाच्या प्रगतीमध्ये नागरिकांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, भारतातील प्रौढ लोकसंख्येमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण गंभीररीत्या वाढत आहे. ही चिंतेची बाब म्हणायला हवी.
महत्त्वाचे आकडे:
- तेलंगणा: 32.3 टक्के पुरुष लठ्ठपणाच्या विळख्यात.
- दिल्ली: 41.3 टक्के महिलांचे वजन प्रमाणाबाहेर.
- आंध्र प्रदेश: 36.3 टक्के महिला अतिवजनाच्या समस्याग्रस्त.