Former CJI BR Gavai : माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई (BR Gavai) यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यासाठी दाखवलेली औदार्यपूर्ण आणि अभूतपूर्व कृती सध्या चर्चेत आहे. नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतल्यानंतर, न्या. गवई यांनी राष्ट्रपती भवनातून बाहेर पडताना अधिकृत ब्लॅक मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) कारचा वापर केला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
खासगी वाहनाने घरी परतले, कारण...
न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी शपथविधी सोहळ्यानंतर घरी परतण्यासाठी अधिकृत वाहनाचा वापर न करता खासगी वाहन निवडले. आपल्या उत्तराधिकाऱ्याला पहिल्या दिवसापासूनच अधिकृत वाहन उपलब्ध व्हावे, हा त्यांचा या निर्णयाचा उद्देश होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "शपथविधी सोहळ्यानंतर, न्या. गवई यांनी सरन्यायाधीशांसाठी असलेले अधिकृत वाहन तसेच ठेवले आणि दुसऱ्या पर्यायी वाहनातून राष्ट्रपती भवनातून परतले. यामुळे त्यांचे उत्तराधिकारी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी तातडीने ते अधिकृत वाहन वापरू शकतील." न्या. गवई यांनी आपल्या कृतीतून उच्च पदावरील व्यक्तीनेही औपचारिकता आणि सोयीपेक्षा संस्थात्मक शिष्टाचार महत्त्वाचा मानल्याचे दाखवून दिले.
( नक्की वाचा : 'आंबेडकरी जीवन कलंकित करण्याचा...'; RSS कार्यक्रमाबाबत सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचे स्पष्टीकरण, निर्णय जाहीर )
निवृत्तीनंतर कोणतीही नियुक्ती घेणार नाही
न्यायमूर्ती गवई हे रविवारी (Sunday) निवृत्त झाले. त्यांनी रविवारी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, ते निवृत्तीनंतर कोणतीही शासकीय नियुक्ती (Post-Retirement Assignment) स्वीकारणार नाहीत.
याबद्दल बोलताना ते म्हणाले, "मी पदभार स्वीकारला तेव्हाच हे स्पष्ट केले होते की, निवृत्तीनंतर कोणतेही अधिकृत पद स्वीकारणार नाही. पुढील 9 ते 10 दिवसांचा काळ हा 'कूलिंग-ऑफ पिरेड' असेल. त्यानंतर मी एक नवी इनिंग सुरू करेन," असे त्यांनी सांगितले.
नवे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी घेतली शपथ
राष्ट्रपती भवनात सोमवारी (24 नोव्हेंबर) झालेल्या एका छोटेखानी समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली. न्यायमूर्ती सूर्यकांत हे पुढील सुमारे 15 महिने (15 months) देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही उपस्थिती लावली.