Shibu Soren Passed Away: झारखंडच्या राजकारणातून एक दुखःद बातमी समोर आली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन यांचे निधन झालं आहे. अनेक दिवसांपासून ते आजारी होते, याच आजारपणातून त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे संस्थापक शिबू सोरेन यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही दुःखद बातमी दिली. "आदरणीय दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. आज मी शून्य झालो." अशा शब्दात हेमंत सोरेन यांनी शोक व्यक्त केला.
शिबू सोरेन हे एका महिन्याहून अधिक काळ राजधानी दिल्लीमध्ये सर गंगाराम रुग्णालयात दाखल होते. शिबू सोरेन (81) यांना किडनीशी संबंधित समस्यांमुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिबू सोरेन यांची राजकीय कारकीर्दही अत्यंत संघर्षमय राहिली. देशाच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेली ओळख इतर कोणत्याही उदाहरणाने अतुलनीय आहे. एका सामान्य कुटुंबापासून मुख्यमंत्रीपद असा संघर्षमय प्रवास त्यांनी केला.