पाकिस्तानची इंटरनॅशनल बेईज्जती; सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह 14 कॅप्टनने लिहिले पत्र

या पत्रावर सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्याशिवाय माईक अथर्टन, अ‍ॅलन बॉर्डर, इयान चॅपेल, ग्रेग चॅपेल, स्टिव्ह वॉ, क्लाइव्ह लॉयड, नासिर हुसेन आणि जॉन राईट यांसारख्या माजी कर्णधारांनी सह्या केल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि विश्वविजेत्या क्रिकेट संघाचे कर्णधार राहिलेल्या इम्रान खान यांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल क्रिकेट जगतातून चिंता व्यक्त केली जात आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह जगातील 14 माजी कर्णधारांनी एकत्र येत पाकिस्तान सरकारला एक पत्र लिहिले आहे. इम्रान खान सध्या रावळपिंडीच्या अदियाला कारागृहात असून, त्यांना तातडीने योग्य वैद्यकीय सुविधा आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सन्मानाची वागणूक मिळावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

इम्रान यांना एका डोळ्याने दिसेनासे झाले

अदियाला कारागृहात असलेल्या 73 वर्षीय इम्रान खान यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यात. तुरुंगात नीट उपचार मिळत नसल्याने आणि तुरुंगातील घाणेरड्या वातावरणामुळे इम्रान यांना एका डोळ्याने फार दिसत नाहीये. याबद्दल अनेक माजी कर्णधारांनी चिंता व्यक्त केली आहे. माजी कर्णधारांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की "आम्ही सर्वजण इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल आणि गेल्या अडीच वर्षांपासून त्यांना ज्या परिस्थितीत ठेवले आहे, त्याबद्दल काळजीत आहोत. क्रिकेटच्या मैदानावरील मूल्ये आम्हाला फेअर प्ले आणि सन्मान शिकवतात. इम्रान खान हे जागतिक क्रिकेटमधील एक मोठं व्यक्तिमत्व असून ते पाकिस्तानचे माजी राष्ट्रप्रमुखही आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात चांगली वागणूक मिळणे आवश्यक आहे,"  

कोणी कोणी केलीय पत्रावर सही ?

या पत्रावर सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्याशिवाय माईक अथर्टन, अ‍ॅलन बॉर्डर, इयान चॅपेल, ग्रेग चॅपेल, स्टिव्ह वॉ, क्लाइव्ह लॉयड, नासिर हुसेन आणि जॉन राईट यांसारख्या माजी कर्णधारांनी सह्या केल्या आहेत.  या पत्राद्वारे माजी क्रिकेटपटूंनी मागणी केली आहे की, इम्रान खान यांच्यावर त्यांच्या पसंतीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तातडीने वैद्यकीय उपचार केले जावेत. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार वागणूक मिळावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना नियमित भेटू द्यावे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992 चा विश्वचषक जिंकला होता. 2023 मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
 

Topics mentioned in this article