Goa Night Club Fire News: गोव्यामधून आगीची भयंकर दुर्घटना समोर आली आहे. गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये रविवारी रात्री 1 च्या सुमारास सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये तीन महिला, 20 पुरुषांसह 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये काही पर्यटकांसह रोमियो लेनमधील क्लब बर्चचे कर्मचारी होते. या दुर्घटनेत 50 हून अधिक जखमी झाले असून त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.
मध्यरात्री अग्नितांडव, 23 जणांचा मृत्यू
प्राथमिक अहवालात मृतांमध्ये चार पर्यटक आणि 19 क्लब कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. ही आग गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनीही सिलेंडरचा स्फोट झाल्याचं सांगितले आहे. मात्र नाईटक्लबजवळ राहणाऱ्या स्थानिकांनी सांगितले की त्यांना कोणताही आवाज ऐकू आला नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मुख्यमंत्र्यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला तसेच गोवा सरकार याची सखोल चौकशी करेल आणि दोषी आढळणाऱ्यांना अटक करेल, असं आश्वासन त्यांनी दिले आहे.
भाजप आमदार मायकल लोबो यांनी उत्तर गोवा रेस्टॉरंट आगीबद्दल दुःख व्यक्त केले. मृतांपैकी बहुतेक जण रेस्टॉरंटच्या तळघरात काम करणारे स्थानिक होते. त्यांनी सांगितले की, या घटनेनंतर गोव्यातील इतर सर्व रेस्टॉरंटचे सुरक्षा ऑडिट करणे आवश्यक आहे. पर्यटक नेहमीच गोव्याला एक अतिशय सुरक्षित ठिकाण मानत आले आहेत, परंतु ही आग खूप त्रासदायक आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
( नक्की वाचा : IndiGo ला सरकारचा शेवटचा इशारा, प्रवाशांचे अडकलेले पैसे कधी परत मिळणार परत? वाचा सविस्तर )
दरम्यान, गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री 12.04 वाजता अर्पोरा येथील एका रेस्टॉरंटमधून आग लागल्याचा फोन आला. पोलिस, अग्निशमन विभाग आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिस घटनेचे कारण तपासतील आणि त्यांच्या निष्कर्षांवर आधारित पुढील कारवाई करतील.