भीषण दुर्घटना! सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सदर प्रकाराची दखल घेतली असून या प्रकाराची चौकशी करण्यासाठी तत्काळ एका समितीची स्थापना केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. तर या चेंगराचेंगरीत 150 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी हाथरस येथे एका सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ही चेंगराचेंगरी झाली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सत्संगाच्या कार्यक्रमाला झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अनेकांचे मृतदेह बस तसेच टेम्पोमधून आरोग्य केंद्रात आणले जात आहेत.

Advertisement

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सदर प्रकाराची दखल घेतली असून या प्रकाराची चौकशी करण्यासाठी तत्काळ एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. इटाहचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. उमेश कुमार त्रिपाठी यांनी माहिती देताना सांगितले की, "आतापर्यंत 27 मृतदेह रुग्णालयात आले असून त्यापैकी 25 महिला आहेत तर 2 पुरुष आहेत. याव्यतिरिक्त काही जखमींनाही रुग्णालयात आणण्यात आले आहे. सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे हे मृत्यू झाल्याचे कळाले आहे." या सत्संगाला हजर असलेल्या एका महिलेने सांगितले की एका आध्यात्मिक गुरुच्या सन्मानार्थ या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. सत्संग संपल्यानंतर लोकं माघारी निघाले होते आणि त्याचवेळी ही चेंगराचेंगरी झाली.
 

Advertisement
Advertisement

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करण्याचे आणि लोकांना दिलासा देण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आदेश देण्यात आले आहेत. जखमींना योग्य उपचार मिळतील याकडेही लक्ष देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. लक्ष्मी नारायण चौधरी आणि संदीप सिंह या दोन राज्यमंत्र्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. याशिवाय मुख्य सचिव तसेच पोलीस महासंचालक यांनाही घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली वाहात असल्याचे योगी यांनी म्हटले आहे. सदर प्रकाराची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे आदेश दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.