कोरोना व्हायरसचा सामना देशाने केला आहे. या भयंकर रोगाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला होता. त्यात आता आणखी एका रोगाने डोकं वर काढलं आहे. त्याचं नाव ‘ब्रेन-ईटिंग अमीबा' असं आहे. हा रोग थेट मेंदूवरच हल्ला करत आहे. या रोगाने सध्या केरळमध्ये शिरकाव केला आहे. केरळमधील आरोग्य विभाग सध्या ‘प्रायमरी एमेबिक मेनिंगोएन्सेफलायटिस' (PAM) किंवा ‘ब्रेन-ईटिंग अमीबा'च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सतर्क झाला आहे. या असाधारण संसर्गात मेंदूवर गंभीर परिणाम होऊन कधी कधी रुग्णाचा मृत्यूही होतो. या वर्षी केरळमध्ये आतापर्यंत 69 रुग्ण आढळले असून त्यापैकी 19 जणांचा मृत्यू झाला आहे. ‘नेग्लेरिया फाउलेरी' नावाच्या अमीबापासून हा संसर्ग होतो. ज्याला ‘ब्रेन-ईटिंग अमीबा' असेही म्हणतात.
राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, केरळ सध्या गंभीर आरोग्य संकटाचा सामना करत आहे. हा संसर्ग पूर्वी फक्त कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांपुरता मर्यादित होता. पण आता तो राज्याच्या इतर भागांमध्येही पसरत आहे. 3 महिन्यांच्या नवजात बाळापासून ते 91 वर्षांच्या वृद्धांपर्यंत अनेकजण याचे शिकार झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हे रुग्ण कोणत्याही एका पाण्याच्या स्रोताशी जोडलेले नाहीत. त्यामुळे साथीच्या रोगाच्या तपासणीत ते समोर येत आहेत असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
काय आहे ‘ब्रेन-ईटिंग अमीबा'?
केरळ सरकारच्या माहितीनुसार, हा अमीबा केंद्रीय मज्जासंस्थेवर हल्ला करतो. संसर्ग मेंदूच्या उतींचा नाश करतो. ज्यामुळे मेंदूला गंभीर सूज येते आणि अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यू होतो. सामान्यतः हा अमीबा निरोगी मुलांना लक्ष्य करतो. परंतु लहान मुलं आणि तरुणही याची शिकार होऊ शकतात. हा अमीबा स्थिर, गरम आणि गोड्या पाण्यात वाढतो. त्यामुळे घाणेरड्या पाण्यात पोहणारे किंवा अंघोळ करणाऱ्यांना या संसर्गाचा धोका जास्त असतो. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. जागतिक तापमानवाढीमुळेही याचा प्रसार वाढत आहे.
‘ब्रेन-ईटिंग अमीबा'ची लक्षणे
या संसर्गाचा मृत्यूदर खूप जास्त आहे. कारण यावर उपचार करणे खूप कठीण आहे. याची लक्षणे ‘बॅक्टेरियल मेनिनजायटिस' सारखी असतात. ज्यात डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या यांचा समावेश आहे. ही लक्षणे 1 ते 9 दिवसांत दिसू शकतात. काही तासांपासून ते 1 दिवसाच्या आत संसर्ग वाढू शकतो. राज्यात या संसर्गाला रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सरकारने लोकांना तलाव आणि नद्यांसारख्या स्थिर किंवा अशुद्ध पाण्यात पोहणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. पोहताना नाकाला क्लिप लावणे आणि विहिरी व पाण्याच्या टाक्यांची योग्य स्वच्छता व क्लोरीनीकरण करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.