Operation Sindoor : पाकिस्तानकडून गेलेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या लष्करी कारवाईला भारतानं जोरदार उत्तर दिलं आहे. भारतानं पाकिस्तानचे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. त्याचबरोबर हवाई हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचं कंबरडं मोडलं. त्यामुळेच पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकत शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला, हे आता संपूर्ण जगाला माहिती झालं आहे. भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानमध्ये अणुगळती झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. ही चर्चा अफवा असल्याचं सांगत भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं उत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, सोशल मीडियावर काही गोष्टी सध्या सुरू आहेत. इजिप्त आणि अमेरिकेच्या विमानांविषयी बोलले जात आहे. या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडूनच यायची आहेत, पण आमच्या बाजूने ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे, जी लष्कराच्या पत्रकार परिषदेतही सांगण्यात आली होती की आमचे लक्ष्य अगदी स्पष्ट होते.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, काही रिपोर्ट्स आले होते की पाकिस्तानच्या राष्ट्रीय कमांडची 10 मे रोजी बैठक होणार होती, पण नंतर त्यांच्याकडूनच ते नाकारण्यात आले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही अणुसंबंधित गोष्टी नाकारल्या होत्या, जे रेकॉर्डवर आहे. ते म्हणाले की, भारताची यावर भूमिका स्पष्ट आहे की तो अणुबॉम्बच्या धमकीच्या आडून दहशतवादाला सहन करणार नाही.
( नक्की वाचा : Video : 'पराभवानंतरही ढोल वाजवण्याची पाकिस्तानची जुनी खोड, POK रिकामं करा', भारतानं ठणकावलं )
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुहल्ल्याची शक्यता वर्तवण्यावर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आमची लष्करी कारवाई पूर्णपणे पारंपरिक शस्त्रांपर्यंत मर्यादित होती. भारताने त्या दहशतवादी ठिकाण्यांना नष्ट केले जे केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर जगभरातील अनेक निष्पाप लोकांच्या मृत्यूलाही जबाबदार होते.
काय होता सोशल मीडियावर दावा?
सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला होता की भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्सवर हल्ला केला, जिथे कथितरित्या अणुबॉम्बशी संबंधित केंद्र आहे. तथापि, यापूर्वी एअर ऑपरेशन्सचे महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती यांनी या प्रश्नाचं यापूर्वीच उत्तर दिलं होतं. पत्रकार परिषदेत याबाबत विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, 'किराणा हिल्समध्ये काही अण्वस्त्र ठेवण्याच्या जागा आहेत हे आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला याबद्दल माहिती नव्हती.' त्यानंतर त्यांनी गंभीरपणे सांगितले, 'आम्ही किराणा हिल्सवर हल्ला केला नाही, तिथे जे काही आहे ते. मी कालच्या माझ्या पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली नव्हती.'