IndiGo ला सरकारचा शेवटचा इशारा, प्रवाशांचे अडकलेले पैसे कधी परत मिळणार परत? वाचा सविस्तर

IndiGo Crisis: केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने (MoCA) देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या IndiGo ला मोठा आणि कडक इशारा दिला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
IndiGo Crisis: इंडिगो विमान कंपनीला सरकारनं कठोर निर्देश दिले आहेत.
मुंबई:

IndiGo Crisis: केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने (MoCA) देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या IndiGo ला मोठा आणि कडक इशारा दिला आहे. तांत्रिक बिघाडामुळे रद्द झालेल्या विमानांमुळे प्रभावित झालेल्या सर्व प्रवाशांचे प्रलंबित रिफंड येत्या 7 डिसेंबर (रविवार) रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पूर्णपणे क्लियर करण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत. निर्धारित वेळेत रिफंड प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर नियामक मंडळाकडून कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मंत्रालयाने दिला आहे.

मंत्रालयाच्या सचिवांनी IndiGo चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उशिरापर्यंत चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर हे निर्देश जारी केले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून IndiGo च्या सिस्टीममध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे शेकडो विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला होता किंवा ती उड्डाणे रद्द झाली होती, ज्यामुळे देशभरात हजारो प्रवासी अडकून पडले होते. रिफंड मिळत नसल्याच्या आणि सामान परत मिळत नसल्याच्या तक्रारी प्रवासी सोशल मीडियावर सातत्याने करत होते.

सरकारच्या  स्पष्ट सूचना

मंत्रालयाने IndiGo ला तातडीने खालील महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत:

7 डिसेंबर रोजी रात्री  8 वाजेपर्यंत सर्व प्रलंबित रिफंडची प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
रद्द झालेल्या विमानांच्या प्रवाशांकडून पुन्हा बुकिंग (Re-scheduling) किंवा नवीन तिकीट बुकिंगसाठी (Re-booking) कोणतेही शुल्क आकारू नये.
IndiGo ने तातडीनं विशेष प्रवासी सहाय्यता आणि रिफंड कक्ष (Special Passenger Support and Refund Cell) स्थापन करावा, जो 24×7 कार्यरत राहील.
एअरलाइन्सने स्वतःहून (Proactively) प्रत्येक प्रभावित प्रवाशाशी संपर्क साधावा आणि त्यांना रिफंड किंवा नवीन बुकिंगचा पर्याय द्यावा.
संपूर्ण ऑपरेशनल स्थिरता पूर्ववत होईपर्यंत स्वयंचलित रिफंड प्रणाली (Automatic Refund System) सुरु ठेवावी.
सर्व विमानतळांवर अडकून राहिलेले सामान 48 तासांच्या आत संबंधित प्रवाशांपर्यंत पोहोचवावे.
DGCA च्या प्रवासी हक्क सनदेनुसार (Passenger Rights Charter) निश्चित केलेली भरपाई प्रवाशांना द्यावी.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी विशेष लक्ष आणि मदत सुनिश्चित करावी.


आता कोणतेही कारण चालणार नाही'*

मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन आम्ही IndiGo ला स्पष्ट केले आहे की, 'आता कोणतेही कारण चालणार नाही'. दिलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्यास अत्यंत कठोर पाऊले उचलली जातील.

Advertisement

या विषयावर IndiGo कडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, परंतु सूत्रांनुसार, एअरलाईन्स सर्व तक्रारी वेळेवर निकाली काढण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा  आणि एअरलाईन्स कस्टमर केअरशी किंवा नव्याने स्थापन होणाऱ्या विशेष कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मंत्रालयाने हेल्पलाइन नंबर आणि ईमेल देखील जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

वाढलेल्या भाड्यावरही कठोर भूमिका

IndiGo च्या ऑपरेशनल संकटाच्या काळात काही एअरलाइन्सद्वारे असामान्यपणे जास्त भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारींवरही नागरिक उड्डयन मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. प्रवाशांना महागड्या तिकिटांपासून वाचवण्यासाठी मंत्रालयाने सर्व प्रभावित मार्गांवर भाडे मर्यादा (Fare Cap) लागू केली आहे. यामुळे प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या संधीसाधू दरवाढीपासून संरक्षण मिळेल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

Advertisement

सर्व एअरलाईन्सना नवीन निश्चित केलेल्या भाड्याच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि ही नियमावली स्थिती पूर्णपणे सामान्य होईपर्यंत लागू राहील.
 

Topics mentioned in this article