जिद्द असेल तर अशक्य गोष्टी ही शक्य करता येतात. मग त्याला वयाची अट नसते. याचचं जिवंत उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. एका 94 वर्षांच्या आजीने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये एक दोन नाही तर चार गोल्ड मेडल जिंकली आहेत. तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे. शिवाय आजीच्या जिद्दीला ही सलाम केला जात आहे. विशेष म्हणजे आजीने एकाच क्रिडा प्रकारामध्ये भाग घेतला नाही. तर ती वेगवेगळ्या चार क्रिडा प्रकारात खेळली आणि चारही ठिकाणी जिंकली.त्यामुळे तर तिचे विशेष कौतूक केले जात आहे.
या आजीचं नाव आहे. पाणी देवी गोदारा. त्या राजस्थानच्या बिकानेरच्या राहाणाऱ्या असून त्यांचे वय 94 वर्षे आहे. ॲथलीट असलेल्या पाणी देवी गोदारा यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की दृढनिश्चय आणि मेहनत याला वयाची मर्यादा नसते. चेन्नई येथे आयोजित आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी अविश्वसनीय कामगिरी केली. त्यात त्यांनी चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 4 सुवर्णपदके जिंकली आहे. असं करून त्यांनी केवळ बिकानेरचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नाव उंचावले आहे. 'गोल्डन ग्रँडमा' (Golden Grandma) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाणी देवींनी 100 मीटर धावण्याची शर्यत, डिस्कस थ्रो, शॉटपुट आणि भालाफेक या चारही स्पर्धांमध्ये अव्वल स्थान मिळवले. या वयात त्यांनी दाखवलेली फिटनेस आणि खेळाची क्षमता लक्षणीय आहे.
फिटनेसचे खास रहस्य बिकानेरच्या चौधरी कॉलनीमध्ये राहणाऱ्या पाणी देवींनी आपल्या खेळाच्या आवडीला घरच्या जबाबदाऱ्यांशी उत्तम जोडले आहे. त्या आजही दररोज त्यांच्या गाई-म्हशींची काळजी घेतात. यासाठी त्यांना कठोर शारीरिक श्रम करावे लागतात. त्यांच्या या दैनंदिन कामातूनच त्यांच्या फिटनेसची दिनचर्या सुरू होते. याशिवाय, त्या एका शिस्तबद्ध फिटनेस रूटीनचे पालन करतात. ज्यामुळे त्यांना स्पर्धांमध्ये असाधारण यश मिळवता आले आहे. त्यांची ही अनुशासित जीवनशैली आणि अथक परिश्रम त्यांच्या प्रत्येक यशामागे महत्त्वपूर्ण ठरले आहे.
याच वर्षी मार्च महिन्यात, पाणी देवी गोदारा यांनी बंगळूरु येथे झालेल्या 45 व्या नॅशनल मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शॉटपुट, 100 मीटर धाव आणि डिस्कस थ्रोमध्ये सुवर्णपदके जिंकली होती. या वयात सातत्याने पदक जिंकणे हे केवळ त्यांचे यश नाही, तर ते अनेक लोकांसाठी, विशेषतः वृद्धांसाठी, मोठी प्रेरणा देणारे उदाहरण आहे. जिद्द आणि सातत्य असेल तर शारीरिक क्षमता आणि वय अडथळा ठरत नाही, हेच त्यांनी सिद्ध केले आहे.