भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण वाहन जीएसएलव्ही-F15 द्वारे त्यांचे 100 वे उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले. इस्रोचं हे 100 वं ऐतिहासिक प्रक्षेपण ठरले. इस्त्रोच्या या यशाचे सर्व देशभरातून कौतुक होत असून इस्रोने X वर पोस्ट करून GSLV-F15 च्या यशस्वी प्रक्षेपणाची माहिती दिली आहे.
स्वदेशी क्रायोजेनिक स्टेज असलेल्या जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल (GSLV) ने त्याच्या 17 व्या उड्डाणात, नेव्हिगेशन उपग्रह NVS-02 वाहून नेले आणि 29 जानेवारी रोजी सकाळी6.23३ वाजता येथील दुसऱ्या लाँच पॅडवरून उड्डाण केले. हा नेव्हिगेशन उपग्रह 'नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन' (नाविक) मालिकेतील दुसरा उपग्रह आहे.
GSLV-F15 लाँच करण्याचा काय फायदा आहे?
भारतीय उपखंडातील तसेच भारतीय भूभागाच्या पलीकडे सुमारे1500 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रांमधील वापरकर्त्यांना अचूक स्थान, वेग आणि वेळेची माहिती प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. सोमवारी रात्री 2.53 वाजता 27.30 तासांची उलटी गिनती सुरू झाली. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्या नेतृत्वाखालील हे पहिलेच मिशन आहे. त्यांनी 13 जानेवारी रोजी पदभार स्वीकारला होता.
इस्त्रोच्या या यशानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्वीट करत अभिनंदन केले आहे. श्रीहरिकोटा येथून 100 वे प्रक्षेपण करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन. विक्रमी कामगिरीच्या या ऐतिहासिक क्षणी या विभागाशी जोडले जाणे हा एक भाग्य आहे. टीम इस्रो, तुम्ही एकदा पुन्हा एकदा यशस्वी प्रक्षेपण केले, असे या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तसेच GSLV-F15/NVS-02 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाने भारताला अभिमान वाटला आहे. विक्रम साराभाई, सतीश धवन आणि इतर काही जणांनी केलेल्या छोट्याशा सुरुवातीपासून हा एक अद्भुत प्रवास राहिला आहे आणि अंतराळ क्षेत्र पंतप्रधान मोदींनी "अनलॉक केल्यानंतर आणि अवकाशाला कोणतीही सीमा नाही असा विश्वास दाखवल्यानंतर ही एक मोठी झेप आहे, असेही जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.