J & K Exit Poll : जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनी झाल्या विधानसभा निवडणुका, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Jammu-Kashmir Assembly Elections 2024 चे एक्झिट पोलचे (Exit Poll) निष्कर्ष जाहीर झाले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Jammu-Kashmir Assembly Elections 2024 चे एक्झिट पोलचे (Exit Poll) निष्कर्ष जाहीर झाले आहेत. या पोलनुसार नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) आणि काँग्रेसCongress) यांची आघाडी पुढं आहे. पीपल्स पल्स एक्झिट पोलमध्ये हे दोन पक्ष राज्यात सत्तेत येणारअसा अंदाज आहे. इंडिया टुडे-सीव्होटर आणि दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनंही या आघाडीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेसला नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती करणं फायद्याचं ठरलं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सर्व एक्झिट पोलच्या निष्कर्षानंतर जम्मू काश्मीरमधील एनडीटीव्ही पोल ऑफ पोल्सच्या निष्कर्षानुसार भाजपाला 27 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला 42 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. ही आघाडी बहुमतापेक्षा 4 जागा दूर आहे. पीडीपीला 7 तर अन्य पक्षांना 14 जागा मिळू शकतात. 

जम्मू काश्मीरमध्ये 63 टक्के मतदान

जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान झालं. जम्मू काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन टप्प्यात मिळून एकूण 63.45 टक्के मतदान झालं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा हे मतदान अधिक आहे.

जम्मू काश्मीरमध्ये यापूर्वी 2015 साली विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीनंतर त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली होती. त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रेटीक पार्टीचं सरकार सत्तेवर आलं. भाजपाच्या पाठिंब्यानं मेहबुबा मुफ्ती मुख्यमंत्री झाल्या. पण हे सरकार कार्यकाळ पूर्ण करु शकलं नाही. त्यामुळे राज्यात विधानसभा विसर्जित करावी लागली. 

( नक्की वाचा : Haryana Exit Poll Result : हरयाणामध्ये काँग्रेसचं पुनरागमन, एक्झिट पोलमध्ये बंपर बहुमत )
 

मोदी सरकारनं 2019 साली जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केलं. त्याचबरोबर जुन्या राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्यात आले. कलम 370 रद्द झाल्यानंतर राज्यात झालेल्या या पहिल्याच विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे याला मोठं महत्त्व आहे.