1st July 2025 Changes : मंगळवारपासून जुलै महिना सुरू होत असून 1 जुलै 2025 पासून देशात अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुम्हा आम्हा सर्वांवर होणार आहे. आर्थिक व्यवहार,रेल्वेप्रवास आणि सरकारी सेवा असा सगळ्यामध्ये हे बदल होणार आहेत.
आधार कार्डाशिवाय नवीन पॅन कार्ड मिळणार नाही
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलैपासून नवीन पॅन कार्डसाठी (PAN Card Rule Changed) अर्ज करताना आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. यापूर्वी, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा इतर मूलभूत ओळखपत्रे वापरण्याची मुभा होती, जी आता संपुष्टात येईल.
आयकर रिटर्न (ITR) भरण्याची मुदत वाढवली
करदात्यांना दिलासा देत, CBDT ने आर्थिक वर्ष 2024-2025 (Assesment Year 2025-2026) साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. रिटर्न फाइल करण्यासाठीची मुदत 31 जुलैऐवजी 15 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे.
SBI च्या क्रेडिट कार्ड नियमांत बदल
एसबीआय कार्डने 15 जुलैपासून काही प्रीमियम क्रेडिट कार्ड्स, ज्यात ELITE आणि PRIME प्रकारांचा समावेश आहे, त्यावरील मोफत विमान अपघात विमा सुविधा रद्द करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ, या कार्डधारकांना यापुढे मोफत विमान अपघात कवच मिळणार नाही.
HDFC Bank मोठ्या रकमांसाठीच्या डिजिटल व्यवहारांवर शुल्क
एचडीएफसी बँक 1 जुलैपासून विशिष्ट प्रकारच्या डिजिटल व्यवहारांवर सेवा शुल्क आकारण्यास सुरुवात करेल. यात क्रेडिट कार्डने भाडे भरणे, ₹10,000 पेक्षा जास्त वॉलेट रिलोड, ₹50,000 पेक्षा जास्त युटिलिटी बिल भरणे आणि ₹10,000 वरील गेमिंग व्यवहारांवर 1% शुल्क आकारले जाईल.
ICICI Bank च्या एटीएम, IMPS आणि रोख रक्कम हाताळणी शुल्कात बदल
ICICI Bank ने अनेक बँकिंग सेवांवरील शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्याबद्दलची माहिती ग्राहकांना देण्यात आली आहे. मासिक मोफत मर्यादेपेक्षा जास्त एटीएम व्यवहारांसाठी अतिरिक्त शुल्क, व्यवहाराच्या रकमेनुसार सुधारित आयएमपीएस (Immediate Payment Service) शुल्क आणि मोफत मर्यादेपलीकडे बँक शाखांमधील रोख जमा आणि काढण्यासाठी जास्त शुल्क आकारले जाईल असे बँकेने स्पष्ट केले आहे.
Axis Bank च्या एटीएम शुल्कात वाढ
ॲक्सिस बँकने सेव्हींग, एनआरआय, ट्रस्ट, प्रायोरिटी आणि बरगंडी खातेधारकांसाठी मासिक मोफत मर्यादेपेक्षा जास्त एटीएम व्यवहारांसाठी आकारले जाणारे शुल्क वाढवण्तयाचा निर्णय घेतला आहे. नेटवर्कबाहेरील एटीएममधून पैसे काढल्यास प्रति व्यवहार ₹23 शुल्क लागेल.
दिल्लीत जुन्या वाहनांवर कॅमेरा तंत्रज्ञानाने इंधन बंदी
वायू प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, दिल्ली सरकार 1 जुलैपासून 'एंड-ऑफ-लाइफ' (EoL) वाहनांना इंधन बंदी लागू करणार आहे. या नवीन प्रणालीनुसार, दिल्लीतील सर्व 520 पेट्रोल आणि डिझेल पंपांवर ऑटोमेटेड नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) कॅमेरे बसवले जात आहेत. हे कॅमेरे इंधन पंपांवर प्रवेश करणाऱ्या वाहनांचे नोंदणी क्रमांक आपोआप टिपतील आणि त्यांची VAHAN डेटाबेसमध्ये तपासणी करतील.
रेल्वे भाडेवाढ
1 जुलै 2025 पासून भारतीय रेल्वे निवडक श्रेणीतील प्रवासी भाड्यात किरकोळ वाढ करणार आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या नॉन-एसी क्लाससाठी प्रति किलोमीटर 1 पैसे, तर एसी क्लाससाठी प्रति किलोमीटर 2 पैसे भाडेवाढ होईल. म्हणजेच, 500 किलोमीटरच्या सेकंड क्लासने प्रवास केल्यास ₹५ जास्त द्यावे लागतील. वाढता खर्च अंशतः भरून काढण्यासाठी आणि नेटवर्कवरील सेवा गुणवत्ता सुधारण्यासाठी ही भाडेवाढ केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे तत्काल तिकीट बुकिंगसाठी आधार आवश्यक
1 जुलैपासून IRCTC वेबसाइट आणि ॲपद्वारे केवळ 'व्हेरिफाईड' वापरकर्तेच तत्काल ट्रेन तिकीट बुक करू शकतील. आधार किंवा डिजीलॉकरशी संलग्न असलेल्या इतर सरकारी ओळखपत्रांद्वारे पडताळणी केली जाईल. याव्यतिरिक्त, रेल्वे जुलै अखेरपर्यंत तत्काल तिकीट बुकिंगसाठी ओटीपी-आधारित व्हेरीफिकेशन सुरू करण्याची योजना आखत आहे. यामुळे तत्काळ तिकीटे बुक करण्यासाठी होत असलेल्या गैरप्रकारांना आळा बसेल असा दावा करण्यात आला आहे.
रेल्वे वेटलिस्ट चार्ट सुटण्यापूर्वी 8 तास आधी तयार होणार
सध्या, ट्रेन सुटण्यापूर्वी चार तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जातो, ज्यामुळे वेटींग लिस्टवरील प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कमी वेळ मिळतो. ही समस्या दूर करण्यासाठी रेल्वेने 8 तास आधी चार्ट तयार करण्याचे निश्चित केले आहे.
कॉल मनी मार्केटच्या वेळेत वाढ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंटरबँक कॉल मनी मार्केटच्या कामकाजाची वेळ 1 जुलैपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ही वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होती. यामुळे बँकांना पैसे उधार देणे आणि घेणे यासाठी 2 तास अतिरिक्त मिळणार आहेत.
GSTR-3B रिटर्न मध्ये बदल करता येणार नाही
जुलैपासून GSTR-3B रिटर्न एकदा भरल्यानंतर 'लॉक' होईल हे रिटर्न GSTR-1/1A डेटा वापरून आपोआप भरले जातील आणि सबमिशननंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.