Video Call Murder: पत्नीला गळफास देत असताना पतीने केला व्हिडिओ कॉल; जन्मदात्यांसमोरच संपवला लेकीचा जीव

Wife Murder: भाग्यश्री गळफास घेतल्यानंतर जेव्हा जिवाच्या आकांताने तडफडत होती, तेव्हा मदत करण्याऐवजी प्रवीणने मोबाईल काढून तिचे शूटिंग सुरू केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Wife Murder: प्रवीणने हा व्हिडिओ नातेवाईक आणि मित्रांनाही पाठवला
मुंबई:

Wife Murder: चार भिंतींच्या आत विश्वासाचा खून करणारा एक असा भयानक प्रकार समोर आला आहे, ज्याची कल्पना करूनही कोणाच्याही अंगावर काटा येईल. संशयाच्या भूत मानगुटीवर बसलेल्या पतीने त्याच्याच पत्नीचा अत्यंत निर्घृणपणे जीव घेतला. या नराधमाने केवळ तिची हत्याच केली नाही, तर ती मृत्यूशी झुंज देत असतानाचा तिचा त्रास कॅमेऱ्यात कैद करून तो तिच्या आई-वडिलांना आणि मित्रांना दाखवण्याचा नीचपणा केला.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील गलगली गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अवघ्या 23 वर्षांच्या भाग्यश्री जिगळूर या तरुणीची तिच्याच पतीने, म्हणजेच प्रवीण जिगळूर याने गळफास लावून हत्या केली. प्रवीणने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे टोकाचे पाऊल उचलले. हत्येपूर्वी प्रवीणने लाकडी दांडक्याने तिला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर राहत्या घरात तिला गळफास दिला.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News : पुण्यात शेजाऱ्याचाच दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार; 61 वर्षांच्या नराधमाला ठोकल्या बेड्या )
 

व्हिडिओ कॉल करून आई-वडिलांना दाखवला लेकीचा तडफडणारा जीव

भाग्यश्री गळफास घेतल्यानंतर जेव्हा जिवाच्या आकांताने तडफडत होती, तेव्हा मदत करण्याऐवजी प्रवीणने मोबाईल काढून तिचे शूटिंग सुरू केले. एवढेच नाही तर त्याने थेट तिच्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांच्या समोरच त्यांच्या पोटच्या गोळ्याचा शेवटचा श्वास घेतानाचा भयानक दृश्य दाखवले. त्यानंतर हा व्हिडिओ त्याने नातेवाईक आणि मित्रांनाही पाठवला. या क्रूरतेमुळे घटनेची माहिती मिळताच सुन्न झालेल्या आई-वडिलांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

घरी परतल्याच्या पहिल्याच दिवशी घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने भाग्यश्री गेल्या 2 महिन्यांपासून आपल्या माहेरी राहत होती. प्रवीणने भविष्यात भांडण न करण्याचे आणि नीट नांदवण्याचे आश्वासन दिल्यानंतर ती रविवारी संध्याकाळीच माहेरी परतली होती. मात्र, ती घरात पाऊल ठेवते न ठेवते तोच त्याच संध्याकाळी तिच्या पतीने हा काळिमा फासणारा कट रचला आणि तिचा जीव घेतला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भाग्यश्री हिरव्या ओढणीने लटकलेली दिसत असून ती बेडवर पाय टेकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणची शिक्षिका रहस्यमयरित्या गायब, 4 दिवसांनी सापडला मृतदेह; पोलिसांनी असा लावला हत्येचा शोध )

घटनेची माहिती मिळताच बिलगी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी वाकड-गलगली परिसरातील या संतापजनक घटनेनंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी पती प्रवीण जिगळूर याला अटक केली आहे. या हत्येमागे आणखी काही कारणे आहेत का, याचा पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
 


Topics mentioned in this article