Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलली आहेत. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. याच्या मागे लष्कर-ए-तोय्यबाचा डेप्युटी कमांडर सैफुल्लाह कसूरीचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. भारताच्या कारवाईनंतर कसूरीने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने हल्ल्याचा निषेध केला आहे आणि मी या हल्ल्यासाठी जबाबदार नसल्याचं सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारताने बुधवारी रात्री सीसीएसच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सिंधू नदी पाणी करारावर स्थगिती आणण्यात आली आहे. सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानला पाण्याची टंचाई भासू शकते. यानंतर कसूरीने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात त्याने म्हटलं की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. भारताने कट रचल्याचं या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
कसूरी व्हिडिओमध्ये काय म्हणाला?
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, त्याचा आम्ही निषेध करतो. या हल्ल्यासाठी भारतीय मीडिया मला जबाबदार ठरवत आहे. पाकिस्तानवरही आरोप लावले जात आहेत. ही दु:खद गोष्ट आहे. भारताकडून पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याचा विचार आहे. ते कट्टर शत्रू आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये दहा लाख सैनिक पाठवून युद्धाची परिस्थिती निर्माण केली आहे. भारताने स्वत: पहलगामचा हल्ला घडवून आणला आणि तेच यासाठी जबाबदार आहे. हे त्यांचं कटकारस्थान आहे. पाकिस्तानचा याच्याशी काहीही संबंध नाही.