Who is Khan Sir: ऐकेकाळी बसच्या तिकिटासाठी पुरेशा पन्नास रुपयांची कमतरता असल्याने मैलोन्मैल पायी चालणारा एक तरुण, आज करोडो रुपयांच्या साम्राज्याचा मालक बनतो, ही कथा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच वाटते. एका बाजूला पाटण्यातील कोचिंग क्लासेसच्या जीवघेण्या स्पर्धेतून थेट एफआयआर (FIR) मध्ये नाव येणे आणि दुसरीकडे कॉर्पोरेट कंपन्यांनी दिलेली तब्बल 107 कोटी रुपयांची ऑफर लाथडणे, अशा दोन अत्यंत टोकाच्या प्रवासाने एका शिक्षकाला देशभरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य बदलणारा हा 'बाहुबली' शिक्षक नेमका कोण आहे आणि अवघ्या 40 रुपयांच्या पहिल्या कमाईपासून सुरू झालेला त्यांचा हा थक्क करणारा प्रवास आज 2026 मध्ये कोणत्या वळणावर आला आहे, याची संपूर्ण कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
फैसल खान ते कोट्यवधी विद्यार्थ्यांचे लाडके 'खान सर'
या अद्भूत प्रवासाची सुरुवात झाली उत्तर प्रदेशातील देवरिया येथून, जिथे 1993 मध्ये फैसल खान यांचा जन्म झाला. सुरुवातीचे आयुष्य प्रचंड आर्थिक गरिबी आणि संघर्षात गेले. आज जरी संपूर्ण देश त्यांना 'खान सर' म्हणून ओळखत असला, तरी या नावामागे अनेक वर्षांची मेहनत दडलेली आहे.
एक काळ असा होता की तासन्तास शिकवल्यानंतर त्यांना केवळ 40 रुपये मिळाले होते. जेव्हा ते घरी जाण्यासाठी निघाले, तेव्हा बसचे तिकीट 90 रुपये होते. खिशात पैसे नसल्यामुळे त्यांनी संपूर्ण रस्ता पायी चालत पार केला होता. कोणत्याही भांडवलाशिवाय त्यांनी थेट गंगा नदीच्या काठावर बसून शिकवण्याचा निर्णय घेतला आणि मित्रांच्या मदतीने एक खोली भाड्याने घेऊन आपल्या शिकवणीचा पाया रचला.
(नक्की वाचा : तुमचं पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? भारताची होर्मुजच्या कटकटीतून सुटका, आता या देशातून येणार स्वस्त तेल )
यूट्यूबचा बादशाह आणि उत्पन्नाची साधने
खान सर यांच्या 'खान जीएस रिसर्च सेंटर' (Khan GS Research Centre) या यूट्यूब चॅनेलने देशातील शिक्षणाची व्याख्या बदलून टाकली. अत्यंत सोप्या आणि गावरान भाषेत कठीण विषय समजावून सांगण्याच्या त्यांच्या शैलीमुळे आज त्यांच्या चॅनेलवर तब्बल 2.6 कोटी ते 2.7 कोटी सबस्क्राइबर्स आहेत.
या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांना दरमहा 10 लाख ते 20 लाख रुपयांची कमाई होते. याशिवाय, पाटणा आणि दिल्लीमध्ये 'खान ग्लोबल स्टडीज' या नावाखाली त्यांचे मोठे ऑफलाइन कोचिंग सेंटर्स चालतात, जिथे वार्षिक फी 20000 रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. एका अंदाजानुसार, आज 2026 मध्ये खान सर यांची एकूण संपत्ती 5 कोटी ते 20 कोटी रुपयांच्या घरात आहे.
( नक्की वाचा : Emotional Eating म्हणजे काय? भूक नसतानाही महिला का खातात? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य )
107 कोटी रुपयांची ऑफर लाथडली
खान सर यांच्या संपत्तीपेक्षा त्यांनी नाकारलेल्या पैशांची चर्चा जास्त होते. एका प्रसिद्ध टॉक शोमध्ये त्यांनी स्वतः खुलासा केला होता की, एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने त्यांना आपल्यासोबत जोडण्यासाठी तब्बल 107 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र, खान सरांनी ती ऑफर एका झटक्यात नाकारली.
मी एवढे पैसे घेतले, तर कोटा सारख्या महागड्या ठिकाणी फी भरू न शकणाऱ्या आणि रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या माझ्या गरीब विद्यार्थ्यांचे काय होईल, असा विचार करून त्यांनी पैशांपेक्षा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले. विशेष म्हणजे, त्यांनी ज्या कंपनीची ऑफर नाकारली ती कंपनी आज अस्तित्वातही नाही. 'संपत्ती ही तात्पुरती असते' या विचारावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
का आहेत अडचणीत?
सध्या खान सर एका मोठ्या कायदेशीर वादात अडकले आहेत. पाटण्यातील 'ज्ञान बिंदू' कोचिंग सेंटरचे शिक्षक रौशन आनंद यांच्यासोबत सुरू असलेल्या व्यावसायिक वादामुळे बिहारच्या राजधानीत विद्यार्थ्यांची निदर्शने आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला आहे. या दोन कोचिंग सेंटर्समधील वाद इतका विकोपाला गेला की, त्यातून झालेल्या हिंसक चकमकीनंतर खान सर यांच्यावर थेट एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, एका गोळीबाराच्या व्हिडिओवरून खान सर यांच्या 2 सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अटकही केली आहे. या नव्या वादामुळे खान सर पुन्हा एकदा देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.