Kolkata Doctor Murder : काय होतं पीडित डॉक्टरचं स्वप्न? कसं हवं होतं आयुष्य? डायरीमधून झाला उलगडा

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:


पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या (Kolkata Doctor Rape and Murder Case) करण्यात आली आहे. या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशभरात या प्रकरणात संताप व्यक्त होत असून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI च्या पथकाला पीडित डॉक्टरची डायरी सापडली आहे. त्या डायरीमध्ये पीडितेनं तिच्या आयुष्याची सर्व स्वप्न रंगवली होती. आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमध्ये नराधमांना बळी पडलेल्या पीडितेचं अभ्यासात गोल्ड मेडल मिळवण्याचं ध्येय होतं. तिला तिच्या कुटुंबाची चांगली काळजी घ्यायची होती. तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा या डायरीतून उलगडा झाला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचं डॉक्टर ऑफ मेडिसीनमधये (MD) गोल्ड मेडल मिळवण्याचं ध्येय होतं. मोठी डॉक्टर होण्याची तिची इच्छा होती. या डायरीत तिनं तिचे स्वप्न शब्दबद्ध केले होते. त्याचबरोबर ज्या हॉस्पिटलमध्ये तिला प्रॅक्टिस करण्याची इच्छा होती त्यांच्या नावांचा उल्लेखही या डायरीमध्ये होता.  

मृतदेहाजवळ सापडली डायरी

या प्रकरणाचा यापूर्वी तपास करणाऱ्या कोलताता पोलिसांना पीडितेच्या मृतदेहाजवळ तिची डायरी सापडली होती. या डायरीमधील काही पानं फाटलेली होती. मृतदेहाजवळ मिळालेली डायरी सिलबंद करुन सीबीआय अधिकाऱ्यांना सोपवण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Advertisement

पीडित डॉक्टरचं हस्ताक्षर कसं होतं हे समजून घेण्यासाठी सीबीआयनं तिच्या घरातून तिनं काढलेल्या काही नोट्स देखील ताब्यात घेतल्या आहेत. त्याची तपासणी करण्यााठी त्या नोट्स हस्ताक्षर तज्ज्ञांकडं पाठवण्यात आल्या आहेत. 

( नक्की वाचा : कोलकाताच्या घटनेची पुलवामाशी तुलना, ममतांच्या सहकाऱ्याचं वादग्रस्त वक्तव्य )
 

कधी झाली हत्या?

कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री बलात्कारानंतर या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली. कॉलेजमधील सेमिनार हॉलमध्ये तिचा मृतदेह सापडला. तिचे दोन्ही डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्त वाहत होतं. गळा आणि जबड्याचं हाड तुटलं होतं. या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉयला अटक केली आहे. आरोपी कोलकाता पोलिसांचा नागरिक स्वयंसेवक आहे. हॉस्पिटलमधील सर्व विभागात त्याची ओळख असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा तपास सुरु आहे. 

Advertisement