कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात हॉस्पिटल प्रशासनानं केलेल्या हलगर्जीबाबत न्यायालयानं संताप व्यक्त केला आहे. ममता सरकारच्या भूमिकेवरही कोर्टानं ताशेरे ओढले आहेत. सामान्य नागरिकांमध्येही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. कोलकातामधील डॉक्टरांकडून या विषयावर रस्त्यावर आंदोलन करण्यात येत आहे.
पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या नेते कुणाल घोष यांनी आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या आंदोलनाची तुलना जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये 2019 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी केलीय.
पुलवामा हल्ला प्रकरणातही अद्याप न्याय मिळालेला नाही. देशाच्या सीमेवर तैनात असलेले जवान देखील 'आम्हाला न्याय हवा' या मागणीसाठी आंदोलन करु लागले तर कसं होईल? असा प्रश्न घोष यांनी डॉक्टरांना विचारला आहे.
( नक्की वाचा : चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य )
'तुम्ही बॉयफ्रेंडसोबत फिरा'
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यानं डॉक्टरांच्या आंदोलनावर टीका करत असताना पातळी सोडण्याची ही पहिलीच घटना नाही. खासदार अरुप चक्रवर्ती (TMC MP Arup Chakraborty ) यांनी बांकुरामधील एका सभेत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना उद्देशून ते म्हणाले की, 'आंदोलनाच्या नावावर तुम्ही घरी जाऊ शकता किंवा तुमच्या बॉयफ्रेंडसोबत फिरु शकता. पण या आंदोलनामुळे एखादा रुग्ण दगावला. त्यामुळे लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला, तर आम्ही तुम्हाला वाचवायला येणार नाहीत.
( नक्की वाचा : नर्सला ओलीस ठेवून डॉक्टरनं केलं भयंकर कृत्य, हॉस्पिटलमध्येच घडला सर्व प्रकार )
यापूर्वी बंगाल उदयन गुहा आणि कल्याण बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही याच पद्धतीनं भाषा वापरली आहे. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा या नेत्यांनी दिला आहे.