लाडकी बहीण योजनेमुळे नवरा-बायको झाले वेगळे, 10 वर्षांचा तुटणार होता संसार, पण एका गोष्टीनं...

यामुळे संतप्त झालेली सुनीता 2024 मध्ये माहेरी निघून गेली आणि 2025 मध्ये तिने न्यायालयात धाव घेतली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • दमोह जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेवरून सुरू झालेला कौटुंबिक वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला होता.
  • सुनीता आणि मुकेश प्रजापती यांचा दहा वर्षांचा विवाह असून त्यांना दोन मुले आहेत.
  • पैशांच्या वादामुळे झालेल्या भांडणानंतर सुनीता माहेरी निघून गेली आणि तिने न्यायालयात तक्रार केली होती.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

लाडकी बहीण योजनेमुळे दहा वर्षांचा संसार मोडणार होता. पण वेळीच लोक न्यायालयाने हस्तक्षेप केला अन् पुढचा अनर्थ टळला. मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातून कौटुंबिक वादाची आणि त्यानंतर झालेल्या सुखद सुटकेची एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. 'लाडकी बहीण योजने'च्या पैशांवरून सुरू झालेला वाद चक्क घटस्फोटापर्यंत पोहोचला होता. मात्र, नॅशनल लोकअदालतीमध्ये न्यायाधीश आणि वकिलांच्या समजुतीनंतर 10 वर्षांपासून एकत्र असलेले हे पती-पत्नी पुन्हा एकदा आनंदाने एकत्र राहण्यास तयार झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?
दमोह येथील सुनीता प्रजापती आणि बारी गावातील मुकेश प्रजापती यांचा विवाह 10 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात खटके उडत होते. वादाचे मुख्य कारण ठरली ती म्हणजे 'लाडकी बहीण योजना'. सुनीताला या योजनेचे पैसे मिळत होते. एकदा सुनीता आजारी असताना तिने उपचारासाठी मुकेशकडे पैसे मागितले. त्यावर मुकेशने, "तुला योजनेचे पैसे मिळतात, त्यातून खर्च कर," असे म्हणून पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि मुकेशने तिला मारहाण केली. यामुळे संतप्त झालेली सुनीता 2024 मध्ये माहेरी निघून गेली आणि 2025 मध्ये तिने न्यायालयात धाव घेतली होती.

Advertisement

नक्की वाचा - Kalyan News: अत्रे नाट्यगृहाची दुरवस्था, कलाकारांच्या संयमाचा अंत! Video व्हायरल होताच सर्व जण आवाक

लोकअदालतीत झाली समजूत
कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद अजहर यांच्यासमोर हे प्रकरण आले. लोकअदालतीदरम्यान न्यायाधीश आणि वकिलांनी या जोडप्याला कुटुंबाचे महत्त्व पटवून दिले. छोट्याशा आर्थिक कारणावरून मुलांचे भविष्य आणि 10 वर्षांचे नाते पणाला लावणे चुकीचे असल्याचे त्यांना समजवण्यात आले. सुदैवाने, दोघांनाही आपली चूक उमजली. चूक समजल्यानंतर दोघांनीही पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. तिथेच दोघांनी गळ्यात माळा टाकून नवी सुरूवात केली. 

नक्की वाचा - Shocking news: 'ब्लाईंड मर्डर' पोलीसांनीही अपेक्षा सोडली होती, पण एका वहीतल्या सहीने कमाल केली, थरारक उलगडा

मुलांसह सुखी संसाराला सुरुवात
दोघांनीही जुन्या गोष्टी विसरून पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. "कुटुंब टिकवण्यासाठी लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे," अशी भावना सुनीताने व्यक्त केली. यानंतर हे जोडपे आपल्या मुलांसह हसत-मुखात घरी परतले. केवळ कायद्याचा बडगा न दाखवता लोकअदालतीत या जोडप्याचे मनपरिवर्तन करण्यात आले. 10 वर्षांचे नाते आणि दोन मुलांचा विचार करून या दाम्पत्याने पुन्हा एकमेकांचा हात धरला आहे. किरकोळ वादातून न्यायालयात पोहोचलेल्या या जोडीने आता पुन्हा सुखी संसाराची शपथ घेतली आहे.