Lionel Messi Fans Angry In Kolkata: फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. कोलकातामध्ये मेस्सीचे भव्य स्वागत झाले. सॉल्ट लेक स्टेडियममध्ये त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती, मात्र मेस्सी अवघ्या काही मिनिटातच स्टेडियममधून निघून गेल्याने चाहत्यांचा संताप अनावर झाला. मेस्सीच्या चाहत्यांनी मैदानावर धुडगूस घातला असून खुर्च्या, पाण्याच्या बॉटल्स फेकल्या तसेच होर्डिंग्स फाडत साहित्याचे नुकसान केले.
मेस्सीची झलक पाहायला न मिळाल्याने चाहत्यांचा संताप..
समोर आलेल्या माहितीनुसार, कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सी मॅजिक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. मात्र मेस्सी पाच मिनिटांसाठी स्टेडियममध्ये आला आणि नंतर निघून गेला, ज्यामुळे चाहते प्रचंड संतापले. त्यांनी स्टेडियमवर बाटल्या, बेल्ट आणि खुर्च्या फेकत आपला राग व्यक्त केला. मेस्सी नीट दिसलाही नाही, त्याने खेळही केला नाही, असं म्हणत चाहत्यांनी आपला राग व्यक्त केला.
मेस्सीला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तिकीट खरेदी केले होते. 12,000 पर्यंतचे तिकीट खरेदी करुन चाहते त्याला पाहायला आले मात्र मेस्सीला नीट पाहताही न आल्याने चाहत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र चाहत्यांचा रोष आवरणे त्यांनाही कठीण झाले होते. आमचे पैसे वाया गेले, तो दिसलाही नाही, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मैदानावर येण्याआधी मेस्सीने शाहरुख खान आणि संजीव गोयंका यांच्यासह अनेक लोकांशी भेट घेतली. २०२२ चा फिफा विश्वचषक जिंकणारा मेस्सी कोलकात्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, भारतीय क्रिकेट संघाचा महान कर्णधार सौरव गांगुली आणि सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान देखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या.