अवैध दारुची विक्री आणि त्यामधून होणारे दुष्परिणाम हा एक गंभीर मुद्दा आहे. अवैध दारु पिल्यानं मृत्यू झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. या प्रकारच्या विक्रीला आळा बसावा यासाठी अबकारी विभागानं खास उपाय शोधला आहे. या माध्यमातून दारु खरी की अवैध? हे ग्राहकांना सहज तपासता येईल. त्याचबरोबर दुकानदारांनाही किंमतीमध्ये अफरातफर करता येणार नाही. अबकारी विभागानं दिलेल्या हेलोग्रामचा क्यू आर कोड स्कॅन करुन ग्राहकांना ही सर्व माहिती मिळणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसं आहे अॅप?
राजस्थान सरकारच्या अबकारी विभागानं अवैध दारु विक्री रोखण्यासाठी तसंच हानिकारक दारुच्या दुष्परिणामांपासून नागरिकांना वाचवण्यासाठी एक मोबाईल अॅप तयार केलं आहे. राज एक्साइज सिटीजन (Raj Excise Citizen) असं या अॅपचं नाव असून ते कोणत्याही व्यक्तीला गूगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करता येईल. अनधिकृत पद्धतीनं खरेदी केलेली दारु ही विषारी आणि जीवघेणी असू शकते, असा इशारा राजस्थानचे अबकारी आयुक्त अंश दीप यांनी दिला आहे.
दारु पिणाऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच दारु विकत घ्यावी, यासाठी अबकारी विभागानं तयार केलेलं हे मोबाईल अॅप गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून दारुच्या बाटलीवरील होलोग्रामचा क्यू आर कोड स्कॅन करुन किंवा बाटलीवर लिहिलेला नंबर टाकून दारुचा ब्रँड, कमाल किंमत, पॅकिंग साईज, बॅच नंबर, उत्पादनाची तारीख आणि विक्रेत्या कंपनीचं नाव या सर्व गोष्टी ग्राहकांना तपासता येतील.
अवैध दारु विक्रीला चाप
या अॅपच्या प्रसार आणि प्रचारातून जागरुकता निर्माण होईल. त्याचबरोबर अवैध दारु विक्री रोखण्यास मदत होईल. अवैध दारु आढळली तर त्याची माहिती अबकारी निरीक्षक, जिल्हा अबकारी अधिकारी आणि आयुक्तांच्या कार्यलायात द्यावी. कोणत्याही व्यक्तीनं दिलेल्या माहितीवर योग्य कारवाई केली जाईल, असं अबकारी आयुक्तांनी स्पष्ट केलं.